लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : बाळापूर, शेवाळा रोडवरील संगम बारमध्ये चोरट्यांनी धाडसी चोरी केली. बारमध्ये घुसून निवांतपणे चोरांनी पार्टी केली. दारु पिली, फ्रीजमधल्या खाद्यपदार्थांवर ताव मारला, थाटात पार्टी करून कपाट फोडून १५ हजार रुपये चोरले. पुरावा नष्ट करण्यासाठी वायर तोडले व सिसीटीव्हीचे रेकॉर्डिंग सेव्ह असलेले यंत्र जाळून टाकले. चोरांची बारमधली पार्टी अन् चोरी चर्चेचा विषय बनला आहे.आखाडा बाळापूर येथील बाळापूर- शेवाळा रोडवर संगम बार आहे. गुरूवारी रात्री बार बंद करून सगळे कामगार घरी परतले. त्यानंतर मध्यरात्री कधीतरी अज्ञात चोरट्यांनी बारचा पाठीमागचा दरवाजा तोडून बारमध्ये प्रवेश केला. गोदामाचे कुलूप उघडत नसल्याने कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. आतील लोखंडी कपाट तोडून त्यातले रोख १९ हजार रुपये चोलेले. चोरट्यांनी ही चोरी अत्यंत राजरोसपणे आणि निवांतपणे केली. चोरट्यांनी बारमध्ये पार्टीही केली. बिअर, दारु पिली, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीचे फुटेजमध्ये कैद झाल्याचे लक्षात आल्याने त्याच्या मशीनचे वायर तोडून मशीनयंत्र जाळून टाकले. बारच्या हिशेबाच्या वह्या, रजिस्टर जाळले. फ्रीजमधील दारुच्या, बिअरच्या बाटल्या फोडून नुकसान केले.हा प्रकार सकाळी लक्षात आल्यानंतर बारचे मालक ओम ठमके, मॅनेजर दत्ता कुंडलिक मोरे यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली.बाळापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी पोनि व्यंकटेश केंद्रे, फौजदार तानाजी चेरले, जमादार संतोष नागरगोजे, संजय मारके, पोना भालेराव यांनी भेट दिली. त्यानंतर श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण केले. श्वानाने शेवाळा रोडवरील पुलापर्यंत माग काढला पण त्यापुढे माग निघू शकला नाही. नगदी १९ हजार, एलईडी व डीव्हीआर किंमत ६ हजार असा पंचविस हजाराचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.चोरीची घटना घडलेल्या बारचे मालक, मॅनेजर अन् नातेवाईक सकाळी ११ वाजता ठाण्यात आले. चोरीसंबंधात फिर्याद देताना नगदी ४९ हजार ८०० रुपये गेल्याचे सांगितले. अर्धी तक्रार टाईप झाली पण त्यानंतर पोलिसांनी फिर्यादी व बारमालकाचे समुपदेशन केले. या समुपदेशनामुळे ४९ हजारांवरून चोरीची रक्कम १९ हजारांपर्यंत खाली आली. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत या समुपदेशन सत्रामुळे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच होती.
पार्टी झोडून बारमध्ये केली चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 12:14 AM