हिंगोली : कोरोना महामारी ओसरत चालल्यामुळे शासनाने तूर्त तरी एसटी महामंडळास गत महिनाभरापासून लांब पल्ल्यांच्या बसेस सुरू करण्यास परवानगी दिली आहे. परंतु, अजूनही ग्रामीण भागातील बसेस सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना बसेसची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
जिल्ह्यात एसटी महामंडळाचे हिंगोली, वसमत आणि कळमनुरी असे तीन आगार असून, शासनाच्या सूचनेप्रमाणे कोरोना नियमांचे पालन करण्याच्या अटीवर तिन्ही आगारांनी लांब पल्ल्यांच्या बसेस सुरू केल्या आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नातही वाढ होऊ लागली आहे. ग्रामीण भागातील एसटी बसेस सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाचा आदेश नसल्यामुळे आजतरी ग्रामीण भागात बसेस सुरू करता येणार नाहीत, असे एसटी महामंडळाने सांगितले. महिनाभरापासून हैदराबाद, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, नाशिक तसेच हिंगोली जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या नांदेड, अकोला, वाशिम, परभणी, बुलडाणा या जिल्ह्यांतही एसटी महामंडळाने बसेस सुरू केल्या आहेत.
कोरोना महामारी अजून संपलेली नाही. रोजच एक-दोन कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे चालक-वाहकांना कोरोना नियम पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. जे प्रवासी बसमध्ये चढतेवेळेस मास्क घालणार नाहीत, अशांना बसमध्ये घेऊ नये, अशीही सूचना चालक-वाहकांना दिली आहे. चालक-वाहकांना प्रवाशांसोबत जास्त रहावे लागते हे पाहून एसटी महामंडळाने सर्वांची कोरोना चाचणीही करून घेतल्याचे सांगितले.
पाच दिवसांत एक कोटीचे उत्पन्न घटले
२९ जून ते ३ जुलैदरम्यान डेल्टा प्लस आजाराचा धोका ओळखून परभणी जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये हिंगोली एसटी आगाराने परभणी जिल्ह्यात जाणाऱ्या तसेच परभणीमार्गे इतर जिल्ह्यात जाणाऱ्या बसेस बंद केल्या होत्या. या दरम्यान, औरंगाबादला जाणाऱ्या बसेस काही दिवस रिसोडमार्गे सोडण्यात आल्या. रिसोडमार्गे परवडत नसल्यामुळे नंतर जिंतूरमार्गे बसेस औरंगाबादला पाठविण्यात आल्या. या पाच दिवसांमध्ये हिंगोली आगाराचे जवळपास एक कोटीचे उत्पन्न घटले गेले. ४ जुलैपासून सर्व बसेस परभणीमार्गे सुरू आहेत.
- संजयकुमार पुंडगे, बसस्थानकप्रमुख, हिंगोली