हिंगोली : वडिलांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झालेले, त्यांचा मृतदेह घरात आहे, तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळलेला मात्र तीने सारे धैर्य एकवटले व स्वतःस सावरत आज सुरु झालेल्या दहावीच्या परीक्षेचा पहिला पेपर दिला. घटना आहे तालुक्यातील भोसी या गावची.
चंपती हनवते हे तालुक्यातील भोसी या गावातील रहिवासी आहेत. पूजा ही त्यांची मोठी मुलगी असून ती दहीविला आहे. गुरुवारी तिचा दहावीच्या परीक्षेचा पहिला पेपर होता. यामुळे ती अभ्यासात मग्न होती. यातच काल रात्री चंपती यांचे ( दि. २८) ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांचा मृतदेह अंतिमसंस्कारासाठी काल उशिरा घरी आणण्यात आलेला. काल रात्रीपासूनच संपूर्ण हनवते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळेला आणि आज पूजाचा दहावीचा पहिला पेपर. मात्र या परिस्थितीला धैर्याने सामोरे जात, स्वतःस सावरत पूजाने आजच्या पहिल्या पेपरला उपस्थिती लावली. पेपर देऊन घरी आल्यानंतर पूजाला पाहताच तिच्यासह साऱ्या हनवते कुटुंबाने हंबरडा फोडला. यानंतर चंपती यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले. हनवते यांच्या आकस्मित निधनासोबतच या परिस्थितीत पूजाने दाखवलेल्या धैर्याची चर्चा परिसरात होती.