;हिंगोली: अतिवृष्टीचे अनुदान जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट देण्यात यावे या मागणीसाठी सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर टाकून आंदोलन केले. तर पानकनेरगाव, आजेगाव, कनेरगाव येथे रास्तारोको करण्यात आला.
जुलै व ऑगस्ट महिन्यात सोयाबीन, कापूस, तूर व इतर खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. यानंतर शासनाने १३ हजार ६०० रुपये हेक्टरी जाहीर केले होते. परंतु, जाहीर केलेले अनुदान मोजक्याच शेतकऱ्यांंना मिळाले. त्यामुळे इतर शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने सर्व शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. जोपर्यत शेतकऱ्यांची मागणी मान्य होत नाही तो पर्यत हे आंदोलन सुरु राहील, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. गोरेगाव येथे चार दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे.