पुरजळ पाणीपुरवठा योजनेच्या देयकाची काही रक्कम भरूनही वीजपुरवठा सुरू होत नसल्यावरून वाद सुरू होता. याबाबत जिल्हा परिषद सदस्य तथा सेनेचे गटनेते अंकुश आहेर यांनी अनेकदा प्रश्न उपस्थित केला होता. वीजजोडणी नसल्याने या योजनेची दुरुस्ती करूनही पाणीपुरवठा सुरू करता येत नव्हता. त्यातच जिल्हा परिषदेने २६ लाख रुपयांची रक्कम भरूनही महावितरणने जोडणी दिली नव्हती. मात्र ही रक्कम भरल्यावर वीजजोडणी सुरू करण्याचे महावितरणकडून आश्वासन देण्यात आले होते. ही योजना सुरू न झाल्याने आहेर यांनी वारंवार पाठपुरावा करून यावर अनेकदा प्रश्नही उपस्थित केले. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आर. बी. शर्मा यांच्या दालनात महावितरणचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांच्यासमवेत बैठक झाली. यावेळी गटनेते अंकुश आहेर यांच्यासह अतिरिक्त मुकाअ अनुप शेंगूलवार, दासरवाड यांचीही उपस्थिती होती. यामध्ये ऑक्टोबर २०२०पर्यंत देण्यात आलेल्या वीज देयकाच्या ३० टक्के म्हणजे ६९ लाख तीन हजार ९८५ रुपयांची रक्कम भरण्यात येणार आहे. यासाठीचा प्रस्ताव महावितरणच्या संचालकांकडे पाठविण्यात येणार आहे. त्याला मंजुरी मिळाली तर ही रक्कम भरली जाणार आहे. यावेळी बैठक घेऊन त्याची प्राेसेडिंग तयार करून सावध पवित्रा घेत ही योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेने पुढाकार घेतल्याने ही योजना लवकरच कार्यान्वित होईल, अशी चिन्हे दिसत आहेत.
पुढील टप्प्यात सौरयंत्रणा बसणार : आहेर
वीजजोडणी नसल्याने या योजनेची चाचणी प्रक्रिया थांबलेली आहे. वीजजोडणी मिळाली की ती पूर्ण होईल. त्यानंतर या योजनेच्या पुढील हप्त्याची रक्कमही मिळेल. त्यातून सौर यंत्रणा उभारली जाणार आहे. ही यंत्रणा एकदा उभी राहिली की, वीज देयकाची रक्कम एकतर कमी होईल अथवा देण्याची गरज पडणार नाही. ही बाब वीजनिर्मितीवर अवलंबून आहे. त्यामुळे प्रशासनाने जवळा बाजार, शिरड शहापूर, कुरुंदा यासारख्या मोठ्या गावांचा प्रश्न यात लक्ष घातले पाहिजे, असे जि.प. गटनेते अंकुश आहेर यांनी सांगितले.