लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेत सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसलेल्या शिवसेना व काँग्रेसमध्ये कळमनुरी पंचायत समितीच्या उपसभापती निवडीवरून शीतयुद्धाचा भडका उडाला आहे. पं.स.तील राजकारणाचे पडसाद जि.प.त उमटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.हिंगोली जिल्हा परिषदेत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तीन पक्षांनी मोट बांधून सत्ता स्थापन केली आहे. याच कारणाने कळमनुरी पंचायत समितीत सेनेकडून कोणताच धोका होणार नाही, अशा भाबड्या आशेवर काँग्रेसची मंडळी होती. मात्र सेनेने काँग्रेसमधील अंतर्गत कलहाला असा तडका दिला की, वरिष्ठ राजकीय मंडळींच्याही भुवया उंचावल्या. तसेही पंचायत समितीला फारसा निधी वा नवी कामे करण्याला कोणताच वाव उरला नसल्याने येथे पदाधिकारी होण्यात कुणाला फारसा रस नसतो. केवळ प्रतिष्ठेसाठी काहीजण या पदाला महत्त्व देतात. कळमनुरी पंचायत समितीत झालेला प्रकार नेमका यापैकी कोणत्या प्रकारात गणती करावा, हे कळण्यास मार्ग नाही. ज्या गटाला शिवराणी नरवाडे यांच्या रुपाने जि.प. अध्यक्षपद मिळाले. त्याच गटाच्या गणातील अजय सावंत हे उपसभापती झाले. विशेष म्हणजे सावंत यांचा जि.प.त अध्यक्षांच्या माध्यमातून प्रभाव होता. त्यामुळे पंचायत समितीत पदाधिकारी होण्याचा व्यर्थ प्रयत्न केला.या प्रयत्नांमुळे मात्र भविष्यात काँग्रेस व सेनेतील संबंध ताणले जाण्याची दाट शक्यता आहे. या प्रकाराबाबत तूर्त कोणी जाहीरपणे बोलत नसले तरी खट्टू झालेली मने घेवून ही मंडळी सोबत राहून एकमेकांना पाण्यात पाहील, हे तेवढेच खरे. विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा जि.प.तच हा संघर्ष वाढल्यास नवल नाही.मुटकुळेही ठामचएकीकडे काँग्रेस व शिवसेनेत बेबनाव निर्माण होत असताना भाजपाचे आ.तान्हाजी मुटकुळे यांनीही दलित वस्ती सुधार योजनेच्या कामांची थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे ही कामे थांबली आहेत. त्यामुळे भाजपाही या अंतर्गत कलहाचा फायदा घेण्यास सज्ज असल्याचे दिसत आहे. या कामांबाबत काही सरपंचांनी दबावगट तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र आ.मुटकुळे यांनी दाद दिली नाही.
पं.स.तील पडसाद जि.प.त उमटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:25 AM