- राहुल टकले
हिंगोली : शहरात ठिकठिकाणी उघड्यावर खाद्यपदार्थ ठेवून त्याची विक्री सुरु आहे. त्यामुळे हिंगोलीकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे अन्न व औषधी प्रशासन हिंगोलीचा कारभार परभणीहून पाहत असल्याने शहरातील विक्रेत्यांवर एकही कारवाई झाल्याचे ऐकविण्यात नाही. त्यामुळे या विक्रेत्यांना कसलीही भीती उरलेली नसून खाणाऱ्यांनाही आपल्या आरोग्याची काळजी नसल्याचे दिसून येते.
जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या हिंगोली शहरात विविध ठिकाणाहून येणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे मुख्य मार्गावरील तसेच बसस्थानक, शासकीय कार्यालये परिसरातील हॉटेल्समध्ये नेहमी गर्दी दिसून येते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने माशांचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. या माशा कुजलेल्या कचऱ्यावर बसून या खाद्यपदार्थावर बसत आहेत. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ग्राहकांना खाण्यासाठी देण्यात येणारे हे खाद्यपदार्थ सुरक्षितरीत्या झाकून ठेवण्याकडे व्यावसायिकांचा कानाडोहा होत आहे. शिवाय अनेक ठिकाणी हातगाड्यांवर खाद्यपदार्थांची विक्री होत असून याच्या आजूबाजूलाही कमालीची दुर्गधी व घाण साचल्याचे चित्र आहे. त्यातच यंदा भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी शहरातील सर्व रस्ते मधोमध खोदण्यात आले आहेत. त्यामुळे पाऊस नसताना धूळ तर पाऊस होताच नालीतील सांडपाणी या रस्त्यावर साचत आहे. वाहनांमुळे या सांडपाण्याचे शिंतोडे सर्वत्र उडतात अशा स्थितीत हे पदार्थ खाण्यासाठी कितपत सुरक्षित आहेत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. अन्न व औषध प्रशासन मात्र शहराकडे ढुंकूनही पाहण्यास तयार नसल्याने विक्रेत्यांना फारशी भीती उरलेली नही. त्यामुळे अन्न व औषधी प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षाने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवरअन्न व औषधी प्रशासन विभागाचे कार्यालय परभणीत असल्याने हिंगोली जिल्ह्याकडे या विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. या विभागाचे अधिकारी केवळ स्थानिक पोलिसांनी एखादी कारवाई केल्यास फिर्यादीचे सोपस्कार पार पाडण्यासाठी जिल्ह्यात येतात. हिंगोली जिल्हा परभणीपासून वेगळा होऊन वीस वर्षे उलटली तरीही जिल्ह्यात अन्न व औषधी प्रशासनाचे कार्यालय नाही.
यासंबंधी हिंगोली जिल्ह्याचा अन्न व औषधी प्रशासन विभागाचा पदभार असलेल्या अनुराधा भोसले यांना विचारणा केली असता, मी सुटीवर असल्याने काही सांगता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. शहरात आतापर्यंत एखादी कारवाई केली का, असे विचारले असता, रेकॉर्ड तपासल्याशिवाय सांगता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तर अन्न व औषधी विभागाचे सहायक आयुक्त कृष्णा जयपूरकर यांनी कारवाई सुरु असल्याचे सांगितले.