सेनगाव ( हिंगोली ): नापीकी, शेतीमालाला भाव नाही अशा स्थितीत आर्थिक विवंचनेत सापडलेल्या तालुक्यातील ताकतोडा येथील नामदेव लक्ष्मण पंतगे या शेतकर्याने सेनगाव तहसीलदारांना निवेदन देवून इच्छामरणाची परवानगी मागितली आहे.
तालुक्यातील ताकतोडा येथील शेतकरी नामदेव पंतगे यांनी १६ जानेवारीला सेनगाव तहसीलदार यांना निवेदन दिले आहे निवेदनात म्हटले की, शासनाने कर्जमाफीची फसवी घोषणा केली आहे. सोयाबीनला भाव नसल्याने अत्यल्प दरात सोयाबीनची विक्री करावी लागली, तूरही कमी दराने विकावी लागली. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून खाजगी कर्जही वाढले आहे. मुद्रा योजनेत व्यवसाय चालू करण्यासाठी कर्जासाठी बँकेचे उंबरठे झिजविले पंरतु एकही बँक कर्ज देत नाही. शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ आम्हा सर्वसामान्य शेतकर्यांना मिळत नसून जगावे तरी कसे? या हतबल स्थितीत सापडलो आहे. त्यापेक्षा शासनाने मला इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.