औंढा नागनाथ: तालुक्यातील पिंपळदरी व परिसरातील सात ते आठ गावांमध्ये बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास जमिनीतून गूढ आवाज होऊन सौम्य हादरा जाणवला. अचानक घराच्या भिंती हादरल्यामुळे नागरिक भीतीने घराबाहेर पडले. या परिसरात मागील तीन ते चार वर्षापासून सतत धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी, जामगव्हाण ,सोनवाडी राजदारी,नंदापुर, टेबुरदार या परिसरासह शेजारीलगावांमध्ये सकाळी 6.30 वाजता अचानक जमिनीतून गूढ आवाज आला. यानंतर गावातील घरांच्या भिंती हादरल्या. यामुळे नागरिकांनी भीतीने घरातून पळ काढला. या गूढ आवाजाचे केंद्रस्थान वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे आहे. या परिसरात देखील हादरे जाणवले असल्याची माहिती आहे. या सर्व भागात मागील तीन ते चार वर्षापासून सतत हादरे जाणवत आहेत. प्रशासनाने याबाबत कुठलीही उपाययोजना केलेली नाही. भूवैज्ञानिक मार्फत या भागातील विविध भागातील गूढ आवाजाचे गुपित मात्र उलगडू शकले नाहीत. यामुळे या परिसरातील नागरिकांनी कधी काय होईल या भीतीने अनेक रात्री जागून काढल्या आहेत.