रसवंतीवर वाढली गर्दी
हिंगोली: हिंगोली ते आखाडा बाळापूर या मार्गावरून मोठ्या संख्येने वाहने धावतात. यातील बहुतांश जण विसावा म्हणून हॉटेलवर थांबत आहेत. सध्या उन्हाळा सुरू झाला असून, रसाला मागणी वाढली आहे. ही संधी समजून अनेकांनी ठिकठिकाणी रसवंती सुरू केली आहे. दिवसभर ऊन तापत असल्याने वाहनचालक रसवंतीवर थांबत आहेत. याचा फायदा रसवंती चालकांना होत आहे. यातून रोजगार उपलब्ध झाला असल्याचे रसवंती चालकांतून बोलले जात आहे.
वाळूची अवैध उपसा वाढला
हिंगोली: जिल्हाभरातील बहुतांश वाळू घाटाचे अद्याप लिलाव झाले नाहीत. सध्या अनेकांनी बांधकामे सुरू केले आहेत. वाळूला मागणी वाढल्याने वाळू माफिया वाळूचा अवैध उपसा करीत असून, चढ्या दराने विक्री करीत असल्याचे चित्र आहे. वाळूचा अवैध उपसा होत असला, तरी यातून शासनाचे लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. याकडे लक्ष देऊन वाळूचा अवैध उपसा थांबवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
हरभरा काढणीस सुरुवात
हिंगोली: जिल्हाभरात बहुतांश शेतकऱ्यांनी हरभरा पीक घेतले आहे. सध्या हरभरा पीक काढणीस आला असून, ठिकठिकाणी मजुरांच्या साहाय्याने काढला जात आहे. मात्र, हरभरा पिकाच्या उत्पादनात घट होत असल्याचे शेतकरी बोलत आहेत. यातून पेरणी व मशागतीचा खर्चही निघत नसून, खरीपानंतर रब्बी हंगामातही नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
खड्डे बुजविण्यास सुरुवात
हिंगोली: येथून जाणाऱ्या अकोला रोडवर जागोजागी खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनचालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. या मार्गावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत होती. आता या मार्गावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली असून, अनेक ठिकाणचे खड्डे बुजविण्यात आले आहेत. यामुळे वाहन चालकांची गैरसोय दूर होण्यास मदत मिळाली आहे. या मार्गाचे हॉटमिक्सने डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.
खिळखिळ्या बसला प्रवासी वैतागले
हिंगोली : येथून विविध मार्गावर धावणाऱ्या बहुतांश बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत. बस खिळखिळ्या झाल्याने याचा आवाज होत आहे. याचा प्रवाशांचा त्रास होत आहे. बस खिळखिळ्या होण्यास रस्त्यांची दुरवस्था कारणीभूत असल्याचे प्रवाशांतून बोलले जात आहे. असे असले, तरी हिंगोली आगारास नव्या बसेस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.
स्वच्छतागृहाची साफसफाई करण्याची मागणी
हिंगोली: येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभाग असून, जिल्हाभरातील नागरिक कामानिमित्त येतात, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचारी व नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून कार्यालयात स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. मात्र, काही दिवसांपासून या स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. नियमित साफसफाई करावी, अशी मागणी होत आहे.