हिंगोली: बालमृत्यू रोखण्यासाठी न्युमोकोकल ही लस दिली जाणार असून, यासंदर्भात आजमितीस सर्वच ठिकाणी डॉक्टरांना प्रशिक्षण देत लसीबाबत माहिती दिली जात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
शहरातील जुन्या सरकारी रुग्णालयातील प्रशिक्षण सभागृहात ७ जुलैरोजी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. तसेच न्युमोकोकल आजाराबाबत माहितीही देण्यात आली. न्युमोकोकल लस बालकांना दीड महिना, साडेतीन महिने, नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर दिली जाणार आहे. दीड महिना व साडेतीन महिना हे त्यांचे प्राथमिक डोस राहणार असून, त्यानंतर नऊ महिने पूर्ण झाल्यावर बुस्टर डोस दिला जाणार आहे. न्युमोकोकल लसीकरण मोहीम राज्यात सर्वच ठिकाणी राबविली जाणार आहे. शासनाच्या सूचनेप्रमाणे बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे.
पीसीव्ही लसीकरण केल्यास बालकांमधील न्युमोकोकल आजार व त्यामुळे होणारे बालमृत्यू टाळू शकतात, एवढे मात्र खरे आहे.
गंभीर न्युमोकोकल आजार होण्याचा धोका दोन वर्षांपर्यंतच्या बालकांमध्ये दिसून येत आहे. एक वर्षाच्या आतील मुलांमध्ये धोका सर्वात अधिक असतो. पीसीव्ही लसीकरणाने या गंभीर न्युमोकोकल आजारापासून बालकांचे संरक्षण तर होईलच, सोबत समाजातील इतर घटकांमध्ये न्युमोकोकल आजाराचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे. या लसीची सुरुवात जिल्ह्यात १२ जुलैरोजी होणार आहे.
न्युमोकोकल न्युमोनिया म्हणजे काय?
न्युमोनियाकोकल आजार म्हणजे स्ट्रेप्टोकोकस न्युमोनिया या बॅक्टेरियामुळे होणारा आजार आहे. बॅक्टेरिया शरीरातील विविध भागांमध्ये पसरून वेगवेगळे आजार उत्पन्न करू शकतो. स्ट्रेप्टोकोकस न्युमोनिया हा बॅक्टेरिया (जिवाणू) ५ वर्षाच्या आतील मुलांमधील न्युमोनियाचे प्रमुख कारण आहे.
आजाराची कोणती आहेत लक्षणे.....
न्युमोकोकल न्युमोनिया आजाराची लक्षणे म्हणजे खोकला, ताप येणे, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे आदी सांगितली आहेत. ही लक्षणे आढळून आल्यास त्वरित फॅमिली डॉक्टरांना याबाबत माहिती द्यावी. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार पालकांनी वेळ वाया न घालवता पुढील निर्णय घ्यावा.
शासनाच्या सूचनेप्रमाणे होणार लसीकरण....
न्युमोनियाकोकल लसीबाबत अजूनतरी टप्पे पाडण्यात आले नाहीत. यासाठी जिल्ह्यातील २४ प्राथमिक केंद्रांतील तसेच शहरातील सर्व डाॅक्टरांना प्रशिक्षणादरम्यान सूचना दिल्या आहेत. लवकरच लसीकरणास सुरुवात करण्यात येणार आहे. यानंतर शासनाची जशी सूचना येईल त्याप्रमाणे लसीकरण करण्यात येणार आहे. सर्वच तालुकास्तरावर आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर यांना न्युमोकोकल लसीबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे यांनी दिली.
प्रतिक्रिया.....
आतापर्यंत १४६ देशांमध्ये न्युमोकोकल लस बालकांना देण्यात येत आहे. भारतामध्ये ही लस खासगी रुग्णालयात देण्यात येत होती. परंतु, खासगीमध्ये त्यासाठी १२०० ते ३००० हजार रुपये मोजावे लागत होते. त्यामुळे गरिबांना ही लस घेणे परवडत नव्हते. १२ जुलैपासून ही लस सर्वांना मोफत दिली जाणार आहे.
- डाॅ. सचिन भायेकर, लसीकरण अधिकारी, हिंगोली.