लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : तालुक्यातील गणेशपूर येथे घडलेल्या चार वर्षीय बालकाच्या खून प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी आरोपी म्हणून अटक केलेले तिघेजण महिन्यांपासून तुरूंगात आहेत. आता पोलिसांनी ‘तपास’ करून खून करणारी आजीच असल्याचे निष्पन्न केले आहे. पोलिसांच्या तपास पद्धतीच्या या अजब प्रकाराबद्दल गणेशपूर ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत. शेकडो ग्रामस्थांनी गुरुवारी पोलीस ठाण्यावर येवून संशयीत म्हणून तुरूंगात डांबलेल्यांची त्वरीत सुटका करण्याची मागणी केली.गणेशपूर येथे ९ आॅक्टोबर २०१७ रोजी श्रेयस उर्फ चिंकू बालाजी वाघमारे या चारवर्षीय बालकाच्या खूनाची घटना घडली. प्रथमदर्शनी हा प्रकार लैगिंक अत्याचार असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढून त्या कलमांन्वये गुन्हा दाखल केला. नरबळीचा प्रकार असल्याचीही चर्चा होती.दरम्यान घटना घडून साडेतीन महिन्यांचा अवधी उलटल्यानंतरही आता तपास अधिकाºयांनी मयताची सावत्र आजी रंजनाबाई वाघमारे ही आरोपी असल्याचा शोध लावला व सबळ पुराव्यासह आजीला अटक केली. यासह ईतरही आरोपी आहेत. असा पोलिसांना संशय आहे. याचाच अर्थ अगोदर अटक केलेले व तुरुंगात तीन महिन्यापेक्षा अधीक शिक्षा भोगत असलेले संशयीत आरोपी नाहीत असे स्पष्ट झाले आहे. या प्रकाराने गणेशपूर ग्रामस्थांत संताप व्यक्त करीत आहेत. माजी सरपंचासह तीन जनांना तपास अधिकाºयांच्या चुकीच्या तपासामुळे तुरुंगात राहावे लागले. फिर्यादीने नावे दिली म्हणून गुन्हा नोंदवून अटक केली असाच प्रकार या प्रकरणात घडला आहे. या प्रकरणी निर्दोष असलेल्या संशयीतांची तातडीने सुटका करावी, चुकीच्या फिर्यादीने चुकीची नावे देवून नाहक त्रास दिला त्याच्या विरोधात कारवाई व्हावी व प्रकरणाचा तपास वरिष्ट यंत्रणेकडे देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. गुरुवारी पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले होते. त्यांनी उपविभागीय अधीकारी शशीकिरण काशीद यांना निवेदन दिले. डीवायएसपी काशीद यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. श्रेयशच्या खुनाच्या आरोपाखाली अटक केलेल्या सावत्र आजीने मालमत्तेच्या हव्यासापोटी हा प्रकार केल्याचा संशय पोलीस व्यक्त करीत आहेत. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढू शकते. खून प्रकरणाला आलेले नवीन वळण व आजवर मुख्य आरोपी म्हणून पोलीसांनी अटक केलेले हे प्रकरण चर्चेचा विषय बनला आहे.ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाºयांनी या प्रकरणात संशयित म्हणून गावातील तीन जणांवर गुन्हा नोंदविला. संशयीताना अटक करुन पोलीस कोठडीही मिळविली. सात दिवस व दहा दिवसांची पोलीस कोठडी मिळवल्यानंतरही तपास अधिकाºयांना कोठडीत ‘सत्य’ शोधता आले नाही. परिणामी तेव्हा पासून तिन्ही संशयीत तुरुंगात आहेत.
पोलिसांनी तुरूंगात डांबले तिघांना; आरोपी निघाले भलतेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 11:54 PM