लोकमत न्यूज नेटवर्कवसमत: शहरातील आंबेडकर मार्केटजवळ फळ विक्रेते व पोलिसांत वाद झाला. पोलिसांनी मारहाण केल्याचे फळविक्रेत्यांतून सांगितले जात आहे. हातगाडे उभे करण्याच्या कारणातून हा वाद झाला आहे. सदर घटना २४ मार्च रोजी दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत तीन फळ विक्रेत्यांना बेदम मारहाण करण्यात आली असून इतर पाच-सात फळविक्रेते पळून गेले होते.शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्रसिंग धुन्ने हे २४ मार्च रोजी दहा-बारा पोलिसांसह फळ विक्रेत्यांकडे गेले. यावेळी वाद होऊन पालिसांनी लाठीचार्ज केल्याने यात तिघेजण जखमी झाले. याठिकाणी जवळपास आठ ते दहा फळविक्रेते मागील अनेक वर्षांपासून दररोज फळ विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. मारहाणीनंतर पोलिसांनी फळविक्रेत्यांची सर्व साहित्य तराजू, छत्री टेबले, पोलीस ठाण्यामध्ये जमा केली आहेत. पोलिसांनी आमच्यावर अन्याय केला असल्याची प्रतिक्रिया फळविक्रेते देत आहेत. मारहाण झालेल्या जखमींना वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली आहे. जखमींमध्ये मोहम्मद जावेद म. गफूर, महंमद मुजीब म. खाजा आणि अब्दुल हाफिज अ. रशीद यांचा समावेश आहे.अब्दुल हाफिज यांना जास्त मार असल्याने हाताच्या बोटामध्ये फ्रॅक्चर झाले आहे. पोलिसांकडून जबाब घेण्यात आला नाही. शिवाय फळविक्रेत्यांना मारहाण केली नसल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. पोलिसांनी अचानक मारहाण केली. आमची काय चूक होती, हेच आम्हाला कळायला मार्ग नाही. माफी मागताना हाताच्या बोटावरही लाठीचार्ज केल्याने बोटे फ्रॅक्चर झाली, असे अब्दुल हाफिज यांनी सांगितले.