हिंगोली : पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या सूचनेनुसार ३० ऑगस्ट रोजी रात्री ११ ते ३१ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजेपर्यंत ठिकठिकाणी नाकाबंदी करून कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यात संशयित, अटक वारंट निघालेल्यासह जवळपास ३६ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे सराईत गुन्हेगारांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे.
पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सराईत गुन्हेगार, अवैध धंदे चालकांविरूद्ध कार्यवाहीची कडक भूमिका घेतली आहे. चोरी, घरफोडी, जबरी चोरी, दरोडा आदी गुन्ह्यातील आरोपींची नियमित तपासणी करून त्यांच्याविरूद्ध प्रतिबंधात्मक कार्यवाही केली जात आहे. याचाच भाग म्हणून ३० ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता ते ३१ ऑगस्टच्या पहाटे ५ वाजेपर्यंत गुन्हेगारांची तपासणी, अवैध धंदेविरूद्ध कार्यवाही, फरार, पाहिजे तसेच न्यायालयाचे वारंटमधील आरोपींचा शोध घेण्याच्या व्यापक हेतूने विशेष कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. रेकॉर्डवरील व सराईत गुन्हेगार आहेत अशा १७ ठिकाणी पथकाने तपासणी केली. नाकाबंदी दरम्यान एक वाहन डिटेन करण्यात आले. तर अवैध शस्त्र बाळगणारे दोघेजण पोलिसांच्या हाती लागले.
याशिवाय अटक वारंट निघाले अशा २१ अटक वारंटमधील व्यक्तींना ताब्यात घेतले. हद्दपारीचे आदेश असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात आढळून आल्याने ३ कार्यवाही करण्यात आली. ही कार्यवाही अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीपान शेळके, प्रशांत देशपांडे, पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, विकास पाटील, वैजनाथ मुंडे, रणजित भोईटे, गणेश राहिरे, शिवाजी गुरमे, सहायक पोलिस निरीक्षक अनिल काचमांडे, गजानन बोराटे, विलास चवळी, गजानन मोरे, रवी हुंडेकर, अरूण नागरे, राजेश मलपिलू, शिवसांब घेवारे, पोलिस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने आदींच्या पथकाने कार्यवाही केली.
११ संशयित चोरटे ताब्यात यात अंधाराचा फायदा घेऊन चोरी करण्याच्या उद्देशाने संशयितरित्या लपून बसलेल्या ११ जणांनाही पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याविरूद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.