लोकमत न्यूज नेटवर्कवारंगाफाटा : कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास १ कोटी ६५ लाख ५० हजार रुपयांचा गुटखा घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला होता. गुटखा प्रकरणातील २ आरोपींविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.१३ आॅक्टोबर रोजी एका ट्रकमधून गुटखा वाहतूक केला जात असल्याची गुप्त माहिती आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सपोनि ओमकांत चिंचोलकर यांना मिळाल्यावर त्यांनी सापळा रचून दुपारी १२ च्या सुमारास ट्रक पकडला. दिल्लीहून लातुरकडे ज्वारीच्या पोत्यांतून ट्रकमधून गुटख्याची वाहतूक करण्यात आली. यामध्ये गुटखा मिक्सरची प्रत्येकी ५० किलोचे पोती, एका पोत्याची किंमत ७० हजार रुपये प्रमाणे असून २३५ पोती एकूण १ कोटी ६४ लाख ५० हजार रुपयांचा गुटखा पोलिसांनी पकडला. सदरील गुटखा आखाडा बाळापूर पोलिसांनी ३० लाखांच्या ट्रकसह ताब्यात घेतला असून सदरील ट्रकचा चालक जितेंद्र रमेशचंद्र गौड (रा.बसई डांग, ता. बाडी, जिल्हा धौलपुर राजस्थान) व लोकेंद्र पाथीराम भारती (रा. कोंडुवा,ता.बाडी, जिल्हा धौलपूर, राजस्थान) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.पोलिसांनी परभणी येथील अन्नसुरक्षा कार्यालयात माहिती दिली. त्यावरून १४ आॅक्टोबरच्या पहाटे ४.२४ वाजेच्या सुमारास अन्न सुरक्षा अधिकारी अनुराधा ज्ञानेश्वर भोसले यांच्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे करीत आहेत.
गुटखा प्रकरणातील दोघांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:14 AM