हिंगोली : दरोडा टाकण्याच्या तयारीत लपून बसलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. त्यांच्याकडून तलवार, मिरची पूड आदी साहित्य जप्त केले. ही कारवाई वसमत तालुक्यातील माळवटा फाटा येथे १४ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात पाच जणांविरूद्ध गुन्हा नोंद झाला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वसमत तालुक्यात रात्री गस्त घालत होते. यावेळी माळवटा पाटी येथील एका पुलाजवळ काहीजण लपून बसल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यावरून पथकाने माळवटा पाटीजवळ एका पुलाजवळ पाहणी केली असता काहीजण संशयास्पदरित्या लपून बसल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिंसानी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता दोघेजण हाती लागले तर तिघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी विजय उर्फ बंटी चांदू आढाव, रामदास गजानन पवार (दोघे रा. कामठा ता. अर्धापूर) यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांचेजवळ लोखंडी तलवार, लोखंडी रॉड, मिरची पूड, बॅटरी, दोरी व दोन दुचाकी असा एकूण १ लाख ७० हजार ५५० रूपयांचा मुद्देमाल आढळून आला.
श्रीकांत प्रल्हाद कसबे (दोघे रा. कामठा), वैभव लक्ष्मण सरोदे, भैया साहेब कोलते (दोघे रा. पांगरगाव ता. मुदखेड) यांचा पोलिस पथक शोध घेत आहे. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात पाच जणांविरूद्ध गुन्हा नोंद झाला. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजेश मलपिलू, पोलिस अंमलदार शेख बाबर, विठ्ठल काळे, गणेश लेकुळे, तुषार ठाकरे, दिपक पाटील, नागरे यांच्या पथकाने केली.