हिंगोली: कुटुंबाची पर्वा न करता चोवीस तास समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी पेलणाऱ्या पोलिसांच्या घरांची मात्र दैन्यावस्था झाल्याचे सद्य:स्थितीत पाहायला मिळत आहे. गृहमंत्र्यांनी सुरक्षेची जबाबदारी पेलणाऱ्या पोलिसांना पक्की घरे बांधून देणे गरजेचे झाले आहे.
समाजाच्या सुरक्षेची जाबाबदारी असलेल्या पोलिसांचे वैयक्तिक आयुष्य किती खडतर आहे, हे सांगणे नकोच. हिंगोली जिल्ह्याची निर्मिती १ मे १९९९ मध्ये झाली. त्या अगोदरपासूनच पोलीस वसाहतीची दयनीय अशी अवस्था झालेली आहे. पोलीस वसाहतीत लेकरांना खेळायला बगीचा तर सोडाच, साध्या नाल्याही नाहीत. टीनपत्रे लावून घरात जिल्ह्याचे संरक्षण करणारे पोलीस राहत आहेत. शहरातील जुन्या पोलीस वसाहतीत आजमितीस ११८ घरे असून नवीन वसाहतीत १६८ घरे आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील पाच तालुक्यांत ११०० पोलीस कार्यरत आहेत; पण ड्यूटी चोवीस तास होत असल्यामुळे कुटुंबाला वेळ देणे त्यांच्यासाठी फार अवघड होऊन बसले आहे. दिवसांतून कसाबसा एखादा तास आई, वडील, पत्नी, मुलाला भेटण्यासाठी देता येतो. उरलेल्या २३ तासांमध्ये समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडावी लागते. ‘सदरक्षणाय, खलनिग्रहणाय’ ही शपथ घेऊन पोलीस समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडत आहेत; परंतु त्यांच्या निवासाची मात्र कोणीही काळजी करताना दिसून येत नाही.
शहरातील पलटन भागात असलेल्या पोलीस वसाहतीची दैन्यावस्था झाली असून, घरांच्या बाजूला गवत साचले आहे. वसाहतीत नाल्याच नाहीत, रस्ते नाहीत. पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे चालताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शौचालयाची तर फारच वाईट अवस्था झाली आहे. अनेकांनी घरांसमोर पत्रे लावून आडोसा करून घेतला आहे. पावसाळ्यात तर ही घरे मोठ्या प्रमाणात गळतात. घराबरोबर लेकरांना खेळण्यासाठी मोकळी जागा आहे. मोकळ्या जागेत पोलिसांच्या लेकरांसाठी बगीचा करायला पाहिजे; परंतु साधी खेळणीही या ठिकाणी नाहीत. २४ तास ड्यूटी करून रात्री-बेरात्री विंचूकाड्यात पोलिसांना घर गाठावे लागते. अशावेळी अपघाताची शक्यता असते. समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडणाऱ्या पोलिसांना पक्के घर बांधून देणे हे आज गरजेचे आहे. सद्य:स्थितीत मात्र पोलीस पडक्या आणि गळक्या घरात राहतात.
प्रतिक्रिया
माझे पती पोलीस आहेत; पण ते प्रामाणिकपणे नोकरी करतात याचाच मला सार्थ अभिमान आहे. पोलीस ड्यूटी सर्वांनाच माहीत आहे. एकदा घरातून बाहेर पडल्यानंतर घरी लवकर येण्याची शाश्वती नसते. सकाळी मुलाला शाळेत सोडणे, शाळेतून घरी आणणे, घरात तिखट, मीठ, साखर, पीठ संपले असेल ते घेऊन येते; कारण पतीच्या पोटाबरोबर माझे व लेकराचे पोट आहे. पगार थोडा असला तरी मानाचा आहे. भविष्यात काय लिहिले आहे हे आज तरी सांगता येत नाही. आज मात्र पडक्या घरात राहत आहोत. स्वत:चे घर हवे आहे; पण पगार तसा नाही. तरीही आनंदी आहे. - वंदना आम्ले, गृहिणी