हिंगोली : झन्नामन्ना नावाच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून १० जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या पथकाने सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे २२ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास केली.
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याला उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी २२ एप्रिल रोजी भेट दिली. यावेळी त्यांना गोरेगाव येथील दत्त मेडिकलच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत झन्नामन्ना नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यावरून वाखारे यांनी सपोनि. सुरेश दळवे, पोह. किशन जगताप, गोटरे, पोना. पवार, तारे, सावळे यांना सोबत घेत जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी दहा जण गोलाकार बसून झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत असताना आढळून आले. पोलिसांनी जुगाऱ्यांकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम ३४ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोह. किशन जगताप यांच्या फिर्यादीवरून किशन ज्ञानबा डाखोरे, भगवान रामभाऊ वैरागड, संभाजी आत्माराम मोरे, गजानन आत्माराम वैरागड, कृष्णा वामन कावरखे, सय्यद युसूफ नजीर, प्रल्हाद आनंदा गुडदे (रा. कडोळी), संदीप जनार्दन कावरखे, प्रवीण राजाराम मोरे, माधव धोंडजी कावरखे (रा. गोरेगाव) यांच्यावर जुगार खेळल्याप्रकरणी, तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.