हिंगोली शहरातील सुराणा नगरातील एका १४ वर्षीय मुलीचे अज्ञात आरोपीने अपहरण केल्याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात २३ मे रोजी गुन्हा नोंद झाला होता. मुलगी अल्पवयीन असल्याने सहायक पोलीस निरीक्षक बी. आर. बंदखडके यांनी तत्काळ पोहेकॉ सोपान सांगळे, महिला पोलीस कर्मचारी ज्योती खिल्लारे यांचे पथक तपासासाठी रवाना केले. या पथकाने शहरात ठिकठिकाणी चौकशी केली. अखेर हिंगोली शहरातील महेश बंडू उर्फ दीपक बांगर हासुद्धा घरी नसल्याचे समजले. एकीकडे हिंगोली ग्रामीण पोलीस मुलीचा शोध घेत होते, तर दुसरीकडे स्थानिक गुन्हे शाखेनेही तपास सुरू केला होता. पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, पोकॉ इरफान पठाण यांना मोबाईल लोकेशनवरून शोध घेण्याच्या सूचना केल्या. त्यावरून त्यांचे मोबाईल लोकेशन पूर्णा येथे असल्याचे स्पष्ट झाले. सपोनि. बंदखडके यांनी २४ मे रोजी सांगळे व खिल्लारे यांचे पथक पूर्णा येथे पाठवून अल्पवयीन मुलीस सुखरूप हिंगोलीला आणले. तसेच पोलिसांनी मुलालाही ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
अपहरण झालेल्या मुलीचा पोलिसांनी १४ तासातच घेतला शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:33 AM