आखाडा बाळापूर (हिंगोली ) : येथील जर्दा व्यापारी शेख कादर याचे दोन कोटी रुपयाचे अज्ञात आरोपीतांनी त्याचे अपहरण करून तेलंगणा बॉर्डरवरील जंगलात नेले होते. पोलिसांनी या प्रकरणात वापरण्यात आलेली जीप हैदराबाद येथून जप्त केली आहे. या प्रकरणातील तीन आरोपींची नावेही निष्पन्न झाली आहेत.
आखाडा बाळापूर येथील जर्दा व्यापारी शेख कादर याचे २५ जून रोजी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर मध्यरात्री त्याच्या मुलाला फोन करून अपहरणकर्त्यांनी २ किलो सोने किंवा दोन कोटी रुपये देण्याची मागणी केली. अन्यथा व्यापाऱ्याला मारून टाकण्याची धमकी दिली. ४ वाजेपर्यंत पैसे न दिल्यास बापाचे प्रेत घेवून जा, अशी धमकीही देण्यात आली होती. बाळापूरचे ठाणेदार गणेश राहिरे यांनी तातडीने कारवाई घेवून व्यापाऱ्याची तेलंगना सिमेवरील हुंडा गावाच्या शिवाराच्या जंगलातून मुक्तता केली;परंतु अपहरणकर्ते गाडीसह पळून जाण्यात यशस्वी झाले होते. त्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवली. पोलीस अधीक्षक योगेश कुमार, पोलीस निरीक्षक गणेश राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अच्युत मुपडे, जमादार संजय मार्के, कांबळे यांचे पथक हैदराबादकडे रवाना झाले होते. २७ जून रोजी रात्री उशिरा अपहरणासाठी वापरलेल्या गाडीचा शोध लागला.
लग्नासाठी म्हणून गाडी किरायाने घेतलीजुने हैदराबादमधील कालापत्थर न्यू रोड येथील रहिवाशी असलेले महमंद अतिक महमंद जागीर यांच्या मालकीची सदर जीप आहे. ही गाडी भाड्याने देवून ते उपजिविका चालवितात. २१ जून रोजी भावाचे लग्न असल्याचे सांगून अजहर नामक व्यक्तीने सदर गाडी भाड्याने घेतली. तेव्हापासून ही गाडी त्यांच्याच ताब्यात होती. यातील दोन आरोपीतांचे नावे निष्पन्न झाले असल्याचेही पोलीस सुत्रांनी सांगितले आहे.