आखाडा बाळापूर ( हिंगोली ) : तपास कामावरून परत येत असताना पोलिसांच्या वाहनाला भरधाव टिप्परने जोराची धडक दिली. पोलीस वाहनातील ठाणेदार रवी हुंडेकर व हिंगोली पोलीस दलातील ठसे तज्ञांच्या पथकातील चार कर्मचारी हे किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात दुपारी दीड वाजेच्या सुमारास बाळापुरनजीक झाला.
आखाडा बाळापुर पोलीस ठाणे अंतर्गत भाटेगाव येथे काल रात्री भांडणाची घटना घडली होती. यामध्ये रात्री उशिरा कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणी आज सकाळी तपास करण्यासाठी हिंगोलीवरून ठसे तज्ञांचे पथक आले होते. भाटेगाव येथून तपास करून परत बाळापुर ठाण्याकडे परत येत असताना बाळापुरनजीक आडा पूल ते पिंपरी फाटा दरम्यान एका मालवाहू टिप्परने ( एम. एच. 26- एच -0063 ) पोलिसांच्या वाहनाला जोराची धडक दिली. ही घटना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
यात ठाणेदार रवी हुंडेकर सह फिंगर प्रिंटचे पथकातिल अधिकारी व कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. यात ठसेतज्ञांचे वाहन (एम.एच.38-जी 0388 ) रस्त्याच्या खाली उलटले. बाळापूरचे बीट जमादार संजय मार्के, जमदाडे ,जाधव यांना अपघाताचे वृत्त समजताच तातडीने घटनास्थळी रवाना झाले. ग्रामपंचायत कर्मचारी शेख हारून गाडीच्या पाठीमागून येत असल्याने त्यांनी ग्रामस्थांच्या सहाय्याने तातडीने मदत केली. पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना वाहनातून काढून त्यांना बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.