हिंगोली : औंढा ना. तालुक्यातील जवळा बाजार येथील एका एटीएमची चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांचा डाव हट्टा पोलिसांनी उधळून लावला. २३ मे रोजी रात्री हट्टा ठाण्याचे पथक या भागात गस्त घालत होते. या पथकाने चोरट्यांचा पाठलाग केल्याने चोरटे जीपसह पळून गेले.
मराठवाड्यात काही दिवसांपासून एटीएम चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील चोरीच्या घटनांना आळा घालण्याच्या उद्देशाने पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनीही पोलिस अधिकारी, अंमलदारांना सतर्क राहण्याच्या सूचना देत रात्रगस्त वाढविली आहे. तसेच बँक, एटीएम, सोने-चांदीच्या दुकानात सुरक्षा रक्षक नेमण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, २३ मेच्या रात्री हट्टा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार प्रितम चव्हाण व शेख मदार हे दुचाकीवर जवळा बाजार परिसरात गस्त घालत होते. रात्री १:१५ वाजेच्या सुमारास पथक जवळा बाजार बस स्थानका जवळ आले असता एसबीआय बँकेच्या एटीएम जवळ एक एपी-२३ पासिंगचे असलेली जीप उभी दिसली. त्यात चार-पाच जण असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या विषयी संशय आल्याने पथक चौकशी करण्यासाठी जीपकडे जात होते.
यावेळी पोलिस येत असल्याचे दिसताच जीप वेगाने नागेशवाडीकडे निघून गेली. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला मात्र चोरटे अंधाराचा फायदा घेऊन जीपसह पळून गेले. एटीएम चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांना पळवून लावल्याबद्दल पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हट्टाचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, पोलिस अमलदार प्रितम चव्हाण, शेख मदार यांना प्रशस्तीपत्र व बक्षीस देवून त्यांचा गौरव केला.