लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला विविध ठिकाणी हिंसक वळण मिळाल्याच्या पार्श्वभूमिवर शहरातील विविध भागात पोलीस दिवसभर दुचाकी, चारचाकी वाहनांतून गस्तीवर असल्याचे चित्र दिसून येत होते.हिंगोली जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास विविध भागात शुक्रवारी बंद असल्याच्या वावड्या उठत होत्या. त्यात आखाडा बाळापूर येथे बंद होता. मात्र या अफवांमुळे दुपारपर्यंत शहरात दुकाने उघडलेली असली तरीही रस्त्यांवर गर्दीचा पत्ता नव्हता. त्यातच पोलिसांनीही खबरदारीचा उपाय म्हणून दुचाकींसह चारचाकी वाहनांतून शहरभर गस्त दिली. शहरात कुठेच तणाव नसला तरीही विविध भागात ठरावीक काळानंतर ही मंडळी फिरताना दिसत होती. त्यात हेल्मेटधारी पोलीस पथक फिरत होते. यामुळे शहरभर शांतता होती.जिल्ह्यातील विविध भागात मात्र जाळपोळीच्या घटना घडल्या.शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले जात आहे.
हिंगोलीतही वाढविली होती पोलीस गस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:41 AM