औंढा नागनाथ : येथील बसस्थानकासमोर रस्त्यावर दुचाकी लावणाऱ्या आरोपीने पोलीस कर्मचाऱ्यास अरेरावीची भाषा करीत मारहाण केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औंढा नागनाथ येथील नवीन बसस्थानकासमोर संजय मगर याने ४ जानेवारी रोजी राज्य महामार्गाच्या मधोमध स्वतःची दुचाकी (एमएच ३८ आर ४७८१) रस्त्याच्या मधोमध उभी केली होती. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण झाला होता. याठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचारी राजकुमार सुर्वे यांनी दुचाकी बाजूला घ्या, असे सांगितले असता आरोपी संजय मगर यांनी पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली. कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक पोलिसाच्या कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड करीत आहेत.