हिंगोली: मराठा आरक्षण प्रश्नावरून गतवर्षी जिल्ह्यातील शेकडों गावात सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांना गावबंदीचे फलक झळकले होते. अजूनही आरक्षणाचा प्रश्न निकाली लागला नसल्याने आता पुन्हा मराठा समाजबांधव आंदोलनाच्या पावित्र्यात असून, २९ सप्टेंबर रोजी वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे व गुंडा येथे गावच्या वेशीवर सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांना गाव प्रवेशबंदीचे फलक लावण्यात आले. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्ष नेत्यास गावात प्रवेश दिला जाणार नसल्याचा इशारा मराठा समाजबांधवांनी दिला आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण देण्याची मागणी आहे. त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे नुकतेच उपोषण केले. या उपोषणाला पाठिंबा म्हणून हिंगोली शहरासह जिल्ह्यात अनेक गावांत उपोषण सुरू झाले होते. २५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील उपोषण, आंदोलने स्थगित करण्यात आली. आता २९ सप्टेंबर रोजी वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे तसेच गुंडा येथील सकल मराठा समाजबांधवांनी गावच्या वेशीवर सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी अशा आशयाचे फलक लावले. मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्ष नेत्यास गावात प्रवेश दिला जाणार नाही, असा इशाराही सकल मराठा समाजबांधवांनी दिला आहे.