हिंगोली : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केल्याने त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भाजपने मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. तर राष्ट्रवादी काँग्रेसने मलिक यांचा दोष नसताना सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप करून महात्मा गांधी चौकात धरणे देऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
भाजपने दिलेल्या निवेदनात म्हटले की, मलिक यांच्यावर ईडीने गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले पाहिजे. महाविकास आघाडीच्या इतरही मंत्र्यांनी गैरव्यवहार केला असून, त्यांच्यावरही जर कारवाई झाली नाही तर आणखी आंदोलन करण्यात येईल. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यावर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप करण्यात आले. भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा निषेध असो, अशा घोषणा दिल्या. तर मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोपही केला. यावेळी आ.तान्हाजी मुटकुळे, जिल्हाध्यक्ष रामराव वडकुते, बाबाराव बांगर, संतोष टेकाळे, प्रशांत सोनी, बाळासाहेब नाईक, पप्पू चव्हाण, उमेश नागरे, राजू यादव आदींची उपस्थिती होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनेही म. गांधी चौक भागात आंदोलन करून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी केंद्र सरकार घाबरले की, ईडीला पुढे करते, असा आरोपही करण्यात आला; मात्र या कारवाईपुढे झुकणार नसल्याच्या घोषणाही देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे, शहराध्यक्ष जावेद राज, बालाजी घुगे, हकीम बागवान, दराडे, इरफान पठाण, संतोष गुट्टे, शेख शकील, बेलदार आदी उपस्थित होते.