मतमोजणी केंद्रात ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. मतमोजणी सकाळी १० वाजता सुरू होणार असून त्याअगोदर अर्धा तास अगोदर त्या-त्या गावांतील टपाल मतदान मोजणी करण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येणार असल्याची माहिती तहसीलदार डाॅ.कृष्णा कानगुले यांनी दिली.
औंढा येथे मंदिराकडे जाणाऱ्या बायपास मार्गाला औद्योगिक केंद्र, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, शासकीय विश्रामगृहजवळ बॅरिकेट्स लावण्यात येणार आहेत. याठिकाणी १०० पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी दिली.
सोमवारी मतमोजणी असल्याने रविवारी मतमोजणी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कृष्णा कानगुले यांनी मार्गदर्शक सूचना केल्या. यावेळी निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार सचिन जोशी, नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, अव्वल कारकून शैलेश वाईकर, ज्योती केजकर, उमाकांत मुळे, हनुमान शेळके आदींसह मतदान मोजणी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सकाळी १० वाजेपासूनच प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात होणार असून प्रथम टपाली मताची मतमोजणी होणार आहे. यानंतर २३ टेबलच्या ६ फेऱ्यांतून ७१ ग्रामपंचायतचे निकाल हाती येणार आहेत. यासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात आली असून मतदान मोजणीसाठी येणाऱ्या प्रतिनिधींना ओळखपत्र देण्यात आले आहेत.