हिंगाेली : जिल्ह्यातील पाच साखर कारखाने वगळता इतर एकही मोठा प्रदूषणकारी कारखाना नसल्याने सध्या तरी प्रदूषणापासून मुक्ती मिळत आहे. त्यामुळेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जिल्ह्याकडे फिरकतही नसल्याचे समोर आले आहे.
हिंगोली जिल्ह्याची ओळख ना उद्योग जिल्हा अशीच आहे. जिल्हा निर्मितीनंतर एकही मोठा उद्योग जिल्ह्यात उभा राहू शकला नाही. सध्या जिल्ह्यात पाच साखर कारखाने असून सहा हजार सूक्ष्म व लघू उद्योग असल्याची नोंद जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे आहे. लहान सहान उद्योगातून फारसे प्रदूषण होत नसल्याचा दावा केला जात असला तरी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय परभणी येथे असल्याने प्रदूषण रोखण्याला मर्यादा येत आहेत. परभणीतूनच हिंगोली जिल्ह्याचा कारभार पाहिला जातो.
यासंदर्भात हिंगोली जिल्ह्याचे कामकाज पाहणाऱ्या अधिकाऱ्याशी मोबाइलवरून संपर्क साधला असता परभणी येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय हिंगोलीत नसल्याने प्रदूषणमुक्तीला खिळ बसल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रदूषणाची पातळी किती आहे? प्रदूषणामुळे काय परिणाम होतोय? याबाबतच्या जनजागृतीपासून नागरिक अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे.