हिंगोली : पाॅलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. परंतु, दहावीचा अद्याप निकाल जाहीर झाला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत १०० विद्यार्थ्यांनीच ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील पाॅलिटेक्निकच्या प्रथम व थेट द्वितीय पदविका प्रवेश प्रक्रियेस ३० जूनपासून ई-स्क्रुटीनी व प्रत्यक्ष स्क्रुटिनी पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. दहावीनंतर प्रथम वर्षाला प्रवेश दिला जातो. पाॅलिटेक्निकच्या प्रवेशासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, दहावीचा निकाल अद्याप जाहीर झाला नाही. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत. दहावीचा निकाल लागला नसला, तरी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध होती. जिल्ह्यातील जवळपास १०० विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अभ्यासक्रमासाठी अर्ज भरला आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै असून, आणखी १५ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर प्रवेश प्रक्रियेला वेग येणार असल्याचे तंत्र शिक्षण विद्यालयातून सांगण्यात आले.
दहावी निकालानंतर येणार गती
कोरोनामुळे मागील वर्षीपासून पाॅलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होत आहे.
याहीवर्षी आतापर्यंत केवळ दोन काॅलेजमधून १०० विद्यार्थ्यांनीच अर्ज सादर केले आहेत. दहावीचा निकाल लागल्यानंतर प्रवेश प्रक्रियेला गती येईल.
विद्यार्थ्यांकडे बैठक क्रमांकच नाही
पाॅलिटेक्निकच्या प्रथम वर्षाला दहावीनंतर तर थेट द्वितीय वर्षाला बारावीनंतर प्रवेश मिळतो. दहावी उत्तीर्ण विद्यार्थी पाॅलिटेक्निकला पसंती देतात. मात्र अद्याप दहावीचा निकाल लागला नाही. त्यामुळे प्रवेश अर्ज भरताना विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. असे असले तरी ॲप्लिकेशन क्रमांकावरून अर्ज स्वीकारले जात असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय टळली आहे.
गेल्यावर्षी ५० टक्के जागा रिक्त
गतवर्षी पाॅलिटेक्निक अभ्यासक्रमाचे अर्ज सादर करण्यास दोनवेळा मुदतवाढ दिली होती. मात्र कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाकडे पाठ फिरविली. त्यामुळे जवळपास ५० टक्के जागा रिक्त राहिल्या. यावर्षी सर्व जागा भरल्या जातील, अशी शक्यता दिसत आहे.
उपविभागीय अधिकारी, शाळांना केली विनंती
शासकीय कागदपत्रांअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाने जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालयांना पत्र पाठवून विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याची विनंती एका पत्राद्वारे केली आहे. तसेच निकाल लागल्यानंतर टीसी, गुणपत्रके लवकर देण्यात यावीत, अशी विनंती केली जाणार आहे.
पाॅलिटेक्निकला प्रवेश घ्यायचे निश्चित केले आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत माहितीही घेतली आहे. परंतु, दहावीचा निकाल अद्याप जाहीर झाला नाही. त्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर लगेच प्रवेश अर्ज भरणार आहे.
-प्रगती गुठ्ठे, विद्यार्थिनी
पाॅलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विविध कागदपत्रे लागत आहेत. ही कागदपत्रे काढण्यासाठी वेळ लागत आहे. कागदपत्रे लवकर देण्याची व्यवस्था झाल्यास विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. तसेच अर्ज कसा भरावा, यासंदर्भात मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.
- संकेत खराटे, विद्यार्थी