वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
कळमनुरी: तालुक्यातील ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव वाढला आहे. सद्य:स्थितीत विहिरींना मुबलक प्रमाणात पाणी आहे. परंतु, वीज खंडित होत असल्यामुळे पिकांना पाणी देणे मुश्कील होऊन बसत आहे. महावितरण कंपनीच्या वरिष्ठांनी याची दखल घेऊन ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
गतिरोधकाची मागणी
हिंगोली: शहरातील बसस्थानक ते विश्रामगृह दरम्यान वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही वाहने वेगाने चालविली जात आहेत. त्यामुळे नगरपरिषदेने याबाबीची दखल घेऊन बसस्थानक ते विश्रामगृह या रस्त्यावर योग्य ठिकाणी गतिरोधक बसवावे, अशी मागणी नागरिकातून होत आहे.
नांदेड नाका भागातील पथदिवे बंद
हिंगोली: शहरातील नांदेड नाका, इंदिरानगर आदी भागातील पथदिवे काही दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी चालताना या भागातील नागरिकांना त्रास होत आहे. नगरपरिषदेने याची दखल घेऊन पथदिवे सुरु करावीत, अशी मागणी नागरिकातून होत आहे.
बसस्थानकात कचऱ्याचे ढिगारे
कळमनुरी: शहरातील बसस्थानकात गत काही दिवसांपासून गुटख्याच्या पुड्या, पाण्याची बाॅटल, प्लास्टिक आदी कचरा साचलेला पहायला मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. संबंधित विभागाने स्वच्छता मोहीम राबवून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.
अवैध वाहतूक वाढली
कळमनुरी: तालुक्यातील आखाडा बाळापूर, वारंगा, मसोड, खरवड, सिंंदगी, पोत्रा, बोल्डा आदी ठिकाणी अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना बसविले जाते. त्यामुळे अपघाताची शक्यता वर्तविली जात आहे. पोलिसांनी या प्रकाराची दखल घ्यावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.
लघुशंकागृहाची मागणी
कळमनुरी : शहरातील गुजरी बाजार भागात व्यापाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शहरासह ग्रामीण भागातील नागरिक या ठिकाणी बाजारहाट करण्यासाठी येत असतात. तसेच छोट्या व्यापाऱ्यांनी या ठिकाणी स्टॉल टाकलेले पहायला मिळते. परंतु, गेल्या दिवसांपासून या ठिकाणी मागणी करुनही लघुशंकागृह बांधण्यात आलेले नाही. नगरपरिषदेने व्यापाऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन मोकळ्या जागी लघुशंकागृह उभारावे, अशी मागणी होत आहे.
मुख्य रस्त्यावर स्वच्छता मोहीम राबवावी
आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आखाडा बाळापूर येेथील मुख्य रस्ता ते बसस्थानकापर्यंतच्या रस्त्याच्या कडेला कचरा साचलेला पहायला मिळत आहे. वाऱ्याच्या वेगाने कचरा दुकानात जात आहे. त्यामुळे दुकानदारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायतीने वेळीच याची दखल घेऊन मुख्य रस्ता ते बसस्थानकापर्यंत स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.