वीज खंडित होत असल्यामुळे शेतकरी त्रस्त
कळमनुरी: तालुक्यातील अनेक गावांतील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. यामुळे पिकांना पाणी देणेही शक्य होत नाही. वीज खंडित झाल्यास दिवसभर ताटकळत बसावे लागत आहे. पिकांना पाणी नसल्यामुळे पिके सुकून जात आहेत. महावितरण कंपनीच्या वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था
शिरडशहापूर: औंढा तालुक्यातील शिरशडहापूर येथील वार्ड क्र. ३ मधील दोन्ही सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे हे शौचालय अनेक दिवसांपासून बंदच आहे. यामुळे या भागातील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची मागगणी होत आहे.
शिरडशहापूर येथे कचऱ्याची ढिगारे
शिरडशहापूर: औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील ग्रामपंचायतीचे कर्मचारी पगार नसल्यामुळे संपावर गेले आहेत. त्यांच्या मागण्या शासनाने अजूनही मंजूर केल्या नाहीत. कर्मचारी संपावर गेल्यामुळे गावात ठिकठिकाणी कचऱ्याची ढीग साचले आहेत. सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून गावात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
हिंगोली: शहरातील बसस्थानक, नांदेड नाका, औंढा रोड आदी भागांत मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसत आहेत, त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जनावरांना ओलांडून मार्ग काढावा लागत आहे. नगरपरिषदेच्या संबंधित विभागाने याची दखल घेऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
वळण रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मागणी
कळमनुरी: तालुक्यातील आखाडा बाळापूर, डोंगरकडा, कांडली आदी भागांतील वळण रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. वळण रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वळण रस्त्यांवरील खड्ड्यात डांबरमिश्रित गिट्टी टाकावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
जड वाहनामुळे वाहतुकीस अडथळा
हिंगोली: मागील काही दिवसांपासून शहरातील महावीर चौक, गांधी चौक, शास्त्रीनगर, तोफखाना आदी भागांत जड वाहने येत आहेत. या जड वाहनामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. शहर वाहतूक शाखेने याची दखल घेऊन जड वाहनांना वर्दळीच्या ठिकाणी येण्यास मज्जाव करावा, अशी मागणी होत आहे.