रस्त्यांची दुरवस्था; वाहनचालक त्रस्त
कळमनुरी: राज्य रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे पडले असून वाहनचालकांना अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे. खड्ड्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे, अशा वाहनचालकांच्या तक्रारी आहेत. संबंधित विभागाने याची दखल घेऊन रस्त्यांवरील खड्डे बुजवून वाहनचालकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.
हातगाडे परत रस्त्यावरच
हिंगोली: शहरातील गांधी चौक, इंदिरा चौक, बसस्थानक परिसर आदी भागामध्ये वारंवार सूचना देऊनही हातगाडे रस्त्यावरच गाडे उभे करुन फळांची विक्री करीत आहेत. त्यामुळे या ठिकाणावरुन ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना अतोनात त्रास होत आहे. शहर वाहतूक शाखेने याची दखल घेऊन हातगाडे चालकांना इतरत्र जागा द्यावी, अशी मागणी होत आहे.
शहरातील अंतर्गत रस्ते उखडले
हिंगोली: शहरातील इंदिरानगर, नाईकनगर, गंगानगर, पेन्शनपुरा आदी नगरातील रस्ते उखडले आहेत. काही ठिकाणी नाल्या नसल्यामुळे घाण पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे विविध आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. नगरपरिषदेच्या संंबंधित विभागाने लक्ष देऊन या भागातील रस्ते दुरुस्त करुन नाल्या बांधून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.
महावितरण कार्यालयाचे दुर्लक्ष
आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर व परिसरात विजेचा लपंडाव हा नित्याचाच झाला आहे. यावर्षी पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यामुळे रब्बी हंगामातील पिके चांगली उगवली आहेत. विहिरी, तलावांनाही पाणी भरपूर प्रमाणात आहे. परंतु मागील दहा-पंधरा दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरु असल्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही. परिणामी पिके वाळून जात आहेत. महावितरण कंपनीने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
धुळीमुळे प्रवाशांना होतोय त्रास
हिंगोली: मागील काही महिन्यांपासून बसस्थानकात धुळीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे प्रवाशांना अतोनात त्रास होत आहे. नवीन बसस्थानकाचे काम रखडल्यामुळे प्रवाशांना बसण्यासाठी जागाही नाही. धुळीतच प्रवाशांना बसेसची वाट पहावी लागत आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.