जलस्रोत पडले कोरडेठाक
बासंबा : हिंगोली तालुक्यातील वंजारवाडा भागातील अनेक विहिरी, बोअर कोरडेठाक पडले आहेत. याचबरोबर बऱ्याच बोअर व विहिरींची पाणी पातळी खाली आली आहे. यामुळे या भागातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसून अनेक नागरिकांना सकाळपासूनच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज
हिंगोली : शहरातील अनेक शासकीय कार्यालयातील स्वच्छतागृहांची मोठी दुरवस्था झाली आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर शासकीय कार्यालयांचा समावेश आहे. त्याचबरोबर या स्वच्छतागृहांमध्ये दुर्गंधी राहत असल्याने पूर्ण कार्यालयातच दुर्गंधी पसरत आहे.
अपघाताची शक्यता वाढली
हिंगोली : शहरातील अष्टविनायक चौकात अपघाताची शक्यता वाढली आहे. याठिकाणाहून जवाहर रोड, पोस्ट ऑफिस, रेल्वे स्टेशन व मिलिंद कॉलनीकडे जाणारे चार रस्ते मिळत असल्यामुळे अनेकदा बऱ्याच वाहनांचा इतरत्र ठिकाणी जाताना अपघात होत आहे. अनेकदा कोण कुठे जात आहे याचा अंदाज येत नसल्याने वाहनधारकांचे नेहमी याठिकाणी अपघात होत आहेत.
अवैध पाणी उपसा सुरू
पानकनेरगाव : सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील बेलदरी तलावातून अवैध पाणी उपसा सुरू आहे. यामुळे पुढे काही महिन्यांत पाणीटंचाई निर्माण होईल अशी चर्चा होत आहे. अनेक या तलावांजवळील शेतकरी आपल्या शेतात मोटार लावून तलावातून अवैध पाणी उपसा करीत आहेत.
वन्य प्राण्यांच्या त्रासाला शेतकरी वैतागले
नंदगाव : औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव व परिसरातील शेतशिवारात वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. शेतशिवारातील गहू, हरभरा व भाजीपाला पिकाची नासाडी वन्य प्राण्यांकडून करण्यात येत आहे. यामुळे वनविभागाने लक्ष देऊन या वन्य प्राण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
ग्रामीण भागात बस पोहोचेना
कळमनुरी : तालुक्यातील अनेक गावात कोरोना लॉकडाऊनमुळे बंद झालेली बस अद्यापही सुरू झालेली नाही. बससेवा बंद असल्यामुळे अनेक गावकरी खासगी वाहनांनी प्रवास करीत आहेत. पण खासगी वाहनांचा दर जास्त असून हा सर्वसामान्य नागरिकांना परवडेनासा आहे.
अवैध वाळू उपसा सुरूच
वसमत : महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आल्यानंतरही वसमत तालुक्यात अवैध वाळू उपसा सुरूच आहे. अनेक ट्रॅक्टर, टिप्पर व बैलगाडीतून चोरटी वाळू विक्री होत आहे. रात्रीच्या वेळी वाळू उपसा होत असून या चोरट्या वाळू विक्रीवर आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची मागणी होत आहे.