बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा शेतशिवारातील वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आपले पिकांना पाणी देण्यासह शेतीकामे करताना मोठी अडचण निर्माण होत आहे. तसेच शेतातील वीज वारंवार खंडीत होत असल्याने विद्युत मोटारपंपात बिघाड होत असल्याचे प्रमाणही वाढले आहे.
महामार्गाच्या कामामुळे पिकांवर धूर
बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा शेतशिवाराजवळून होणाऱ्या नवीन राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. या कामामुळे या रस्त्यावर अनेक वाहनांची वर्दळही सुरू झाली आहे. पण या रस्त्यावर वाहनांच्या वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणावर धुर पसरत असून ही धूर रस्त्याकाठी असणाऱ्या शेतातील पिकांवर पसरली जात आहे. यासाठी शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
भरधाव वेगाच्या वाहनांवर आळा घालण्याची मागणी
संतुक पिपंरी : हिंगोली तालुक्यातील संतुक पिंपरी गावातून औंढ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये - जा सुरू असते. गावातून जाणाऱ्या या रस्त्यावर भरधाव वेगाने धावणारे वाहने वाढली असल्याने गावातील नागरिकांना रस्त्यावरुन चालताना व रस्ता ओलांडताना अपघाताचा निर्माण होत आहे. यासाठी या भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांवर आळा घालण्याची मागणी गावातून होत आहे.
तुरीच्या उत्पादनामध्ये घट
संतुक पिंपरी : हिंगोली तालुक्यातील संतुक पिंपरी गावातील तूर पिकाच्या कापणीचे काम वेगात आले आहे. गावाच्या शेतशिवारातील तुरीचे पीक मोठ्या प्रमाणावर उधळल्या गेले असल्याने या पिकात मोठी घट झाली आहे. मोठ्या आशेने लागवड केलेल्या या पिकांतून शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.
तूर कापणीला आला वेग
डिग्रस कऱ्हाळे : हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे गावातील शेतकऱ्यांनी यंदा तुरीचे लागवड मोठ्या प्रमाणावर केली. पण अनेक शेतकऱ्यांच्या तुरी शेंगा धरण्यापुर्वीच उधळल्याही गेल्या. त्यामुळे उरल्या सुरल्या तुरीच्या पिकाची कापणीचे काम सुरू झाले आहे. यंदा तुरीच्या पिकात मोठी घट होण्याची शक्यता शेतकरी वर्तवित आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे.
गावातील उकीरड्यांकडे दुर्लक्ष
रामेश्वर तांडा : कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावातील अनेक मुख्य रस्त्याच्या काठी उकीरडे जमा झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून ग्रामपंचायतीसह लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष झाले असल्याने रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे. यामुळे रस्त्यावरुन ये जा करणाऱ्या वाहनधारकांसह ग्रामस्थांना या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तसेच रस्त्याकाठी राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर या दुर्गंधीचा परिणाम जाणवत आहे. यासाठी गावातील उकीरडे साफ करण्याची मागणी होत आहे.
गहु निंदणीच्या कामाने धरला वेग
बोल्डा : कळमनुरी तालुक्यातील बोल्डा गावासह परिरसरात गहु पिकाची लागवड करण्यात आली आहे. सध्या अनेक महिला शेतकरी गहु निंदणीच्या कामात व्यस्त असून या कामाने आता वेग धरला आहे. अनेक शेतशिवारात लागवड करण्यात आलेले गहुचे पीक बहरले असून या पिकांपासून चांगलेच उत्पन्न मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.
वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला
जवळा पांचाळ : कळमनुरी तालुक्यातील जवळापांचाळ शेतशिवारात वन्य प्राणी घुसण्याचे प्रमाण कमी होता होईना. अनेक शेतातील उसासह गहु व हरभरा पिकाची लागवड करण्यात आली आहे. हरभरा पिक सध्या गाठे धरत असून वन्य प्राणी शेतशिवारात घुसून या पिकाची मोठी नासाडी करीत आहे. यामुळे वन्य प्राण्याचा बंदोबस्त लावण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
बससेवा सुरू करण्याची मागणी
पोतरा : कळमनुरी तालुक्यातील पोतरा गावात येणारी बस मागील पाच ते सहा महिन्यांपासून बंद आहे. यामुळे गावातील वयोवृद्ध, महिला, पुरूष व विद्यार्थ्यांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. अपंग व वयोवृद्धांना महामंडळच्या बसमध्ये असणारी सुविधा ही खाजगी वाहनात मिळत नसल्याने या प्रवाशांना महागडा प्रवास करावा लागत आहे. यासाठी कळमनुरी येथून सुरू असलेली बससेवा पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी गावकरी करीत आहेत.
रस्त्यावर खड्डे खड्डे
हिंगोली : शहरातील कमला नगर, आंबेडकर नगर, शाहु नगर, ज्योती नगरातील मुरूमाच्या रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे नगरवासियांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या नगरातील मुख्या रस्त्यांवर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असल्याने वाहनधारकांची कसरत याठिकाणी होत आहे. यासाठी रस्ता दुरूस्तीची मागणी होत आहे.
बेशिस्त वाहनांमुळे अपघात वाढले
हिंगोली : शहरातील नांदेड नाका, रिसाला बाजार, अकोला बायपास याठिकाणी वाहनधारक आपले वाहन बेशिस्त व भरधाव वेगाने धावत आहे. यामुळे अनेकदा याठिकाणी छोटे - मोठे अपघात होत आहे. या चौकांमध्ये नागरिकांची मोठी वर्दळ सुरू असते. अनेक वाहने भरधाव वेगाने व बेशिस्तीत लावण्यात येत असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी संबंधीत विभागाने या प्रकाराकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
जवळा - पळशी रस्ता उखडला
हिंगोली : शहरातील जवळा - पळशी हा मुख्य मार्ग आहे. या मार्गावर हिंगोली शहरातील नागरिकांसह अनेक गावातील ग्रामस्थांची ये - जा सुरू असते. पण या रस्त्यावर जागोजागी खड्डे तसेच अनेक ठिकाणी रस्ता उखडला असल्याचे दिसते. यामुळे या मार्गावरुन वाहनचालवितांना वाहनधारकांसह प्रवाशी वर्गांना मोठा त्रास होत आहे. शहरी व ग्रामीण भागातील वाहनांची ये जा सुरू असल्यामुळे रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक वाहने खुळखुळी झाली आहेत.