- शिवराज बिचेवार हिंगोली : केंद्र सरकारने सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी अग्निवीर योजना आणली. परंतु, चार वर्षे कर्तव्य बजावल्यानंतर या तरुणांंना परत गावी पाठविले जाणार आहे. शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतलेले हे तरुण बेरोजगार झाल्यानंतर समाजात गुन्हेगारी वाढण्याची दाट शक्यता आहे, असे वक्तव्य खा. राहुल गांधी यांनी केले.
भारत जोडो यात्रेच्या आठव्या दिवशी हिंगोली जिल्ह्यातील माळहिवरा येथे आयोजित कॉर्नर सभेत राहुल गांधी बोलत होते. ते म्हणाले की, सैन्यात जाणारा तरुण हा देशासाठी जीव देण्याच्या तयारीनेच उतरत असतो. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर तो गावी परततो. त्यावेळी गावामध्ये त्यांचे एक वेगळेच वजन असते. त्यामुळे गावाला दिशा देण्याचे काम तो करीत असतो. परंतु, आता सहा महिन्यांचे प्रशिक्षण देऊन थेट युद्धात ढकलणारी अग्निवीर योजना आणली आहे. त्यामुळे या युद्धाचा निकाल काय लागेल, हे सर्वांना माहिती आहे.
मेड इन हिंगोली, नांदेड का नाही? आपल्या खिशातील मोबाइल काढून बघितल्यास त्याच्या पाठीमागे मेड इन चायना असे दिसते. कारण, चायनातील हा माल आपल्या देशात विक्री केला जातो. आपल्याच देशातील अरबपती तो माल येथे विक्री करून नफा कमवतात. देशातील तरुणांना संधी दिल्यास प्रत्येक गोष्ट आपल्या येथेच तयार करण्याची धमक त्यांच्यात आहे. त्यानंतर मेड इन हिंगोली, मेड इन नांदेड असे तुम्हाला दिसून येईल, असेही राहुल गांधी म्हणाले.