हिंगोली : जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारलेले नेतृत्व दिवंगत खा.राजीव सातव यांच्या निधनाने मरगळलेल्या काँग्रेसला प्रज्ञा सातव यांच्या विधान परिषद उमेदवारीने (Pragya Satav's candidature for Legislative Council announced) पुन्हा चैतन्य प्राप्त झाले आहे. जिल्ह्यावर वरचष्मा असलेल्या पक्षाला नाजूक स्थितीतून बाहेर काढण्यासाठी त्यांचे हे पद उपयोगी पडणार आहे.
हिंगोली जिल्ह्यात मोदी लाटेतही काँग्रेसचा प्रभाव सिद्ध करून राजीव सातव यांनी राष्ट्रीय पातळीवर आपल्या कार्याची चुणूक दाखविली होती. मात्र त्यांच्या निधनानंतर जिल्ह्यातील काँग्रेसकडे असे कोणतेच महत्त्वाचे पद उरले नव्हते. पालकमंत्री म्हणून वर्षाताई गायकवाड यांचा तेवढा आधार जिल्ह्याला होता. मात्र सातव यांच्या निधनानंतर प्रज्ञा सातव यांनी पक्षकार्यात झोकून दिले होते. दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानाही काँग्रेसप्रती असलेली निष्ठा व कार्यकर्त्यांशी असलेली सातव घराण्याची नाळ तुटू नये, यासाठी त्या प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत होते. पक्षाने दिलेल्या प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने सहभाग घेवून पक्षवाढीसाठीही त्यांनी प्रयत्न केले.
पक्ष सदस्य नोंदणी अभियानाला स्वत: सुरुवात करून दिली. मात्र जिल्ह्यात काँग्रेसचे हात अधिक बळकट करण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून होत होती. शिवाय सातव यांच्या निधनानंतर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनीही सातव कुटुंबियांच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा राहील, असे सांगितले होते. त्या आश्वासनाची पूर्तता या विधान परिषद उमेदवारीच्या रुपाने होत असल्याचे दिसून येत आहे. प्रज्ञा सातव यांना शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर संधी मिळणार आहे. तीन ते साडेतीन वर्षांचा काळ यामुळे मिळणार आहे. त्यात पक्षासाठी काम करताना कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी हे पद उपयोगी ठरणार आहे.
हिंगोलीत, कळमनुरीत जल्लोषप्रज्ञा सातव यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर केल्याचे मुकुल वासनिक यांचे पत्र प्राप्त होताच हिंगोली व कळमनुरीत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. हिंगोलीत सुरेश सराफ, नेहालभैय्या, माबूद बागवान, शयमराव जगताप, मिलिंद उबाळे, अनिल नेनवाणी, जुबेरमामू, बांगर, मुजीब कुरेशी, आरेफ लाला, माणिक देशमुख, आदींच्या उपस्थितीत फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.