परभणी: नगर जिल्ह्यातील जवखेडा येथील हत्याकांडातील आरोपींना त्वरित अटक करावी, या प्रमुख मागणीसाठी आंबेडकरी संघटनांच्या वतीने पुकारलेल्या परभणी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिवसभर कडकडीत बंद राहिल्याने बाजारपेठ व रस्त्यांवर शुकशुकाट जाणवला. दुपारी शनिवार बाजार येथून काढण्यात आलेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात जिल्हाभरातून नागरिक सहभागी झाले होते.पाथर्डी तालुक्यातील जवखेडा येथे २१ ऑक्टोबर रोजी जाधव कुटुंबियातील तिघांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. या घटनेने फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला काळीमा फासली गेली. घटनेला २0 दिवसांचा कालावधी उलटूनही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे याच्या निषेधार्थ परभणी जिल्ह्यातील आंबेडकरी संघटनांच्या वतीने १0 नोव्हेंबर रोजी परभणी बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला विविध पक्ष,संघटना व विविधस्तरातून जाहीर पाठिंबा देण्यात आला होता. बंदच्या आवाहनानुसार सोमवारी सकाळपासूनच बाजारपेठ कडकडीत बंद राहिली. शहरातील कच्छी बाजार, गुजरीबाजार, जनता मार्केट, शिवाजीचौक, नानलपेठ, गांधी पार्क हा भाग मुख्य बाजारपेठेचा आहे. या ठिकाणी नेहमीच मोठी वर्दळ असते. परंतु, सोमवारी मात्र दिवसभर या भागातील रस्त्यांवर शुकशुकाट जाणवला. विशेष म्हणजे, शहराला लागून असलेल्या वसाहती आणि परिसरातील दुकानेदेखील कडकडीत बंद ठेवण्यात आली. बंदमुळे शहरातील रस्त्यांवर तुरळक वर्दळ दिसून आली. सायंकाळी ४वाजेपर्यंत हा बंद पाळण्यात आला. सायंकाळी ४ वाजेनंतर शहरातील व्यवहार सुरु झाल्याचे पहावयास मिळाले. बंद काळामध्ये शहरातील काही प्रतिष्ठानांवर दगड फेकून काच फोडल्याचा प्रकार वगळता कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही
परभणीत कडकडीत बंद
By admin | Published: November 11, 2014 3:43 PM