हिंगोली : गर्भवतींनी कोरोना लस घ्यावी, असे शासनाने तसेच आरोग्य विभागाने स्पष्ट केले असले, तरी शहरातील तिन्ही केंद्रांवर गर्भवती महिला येत नसल्याचे पाहायला मिळत आहे.
१६ जानेवारीपासून जिल्ह्यातील ३२ केंद्रांसह शहरातील कल्याण मंडपम, सरजूदेवी आणि माणिक स्मारक येथे १८ ते ४४ व त्यापुढील सर्वांचे लसीकरण सुरू आहे. १६ जुलैपासून जिल्ह्यातील सर्वच आरोग्य केंद्रांवर गर्भवती महिलांनी लसीकरण करून घ्यावे, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे. परंतु, कोणत्याच केंद्रावर गर्भवती महिला दिसून येत नाहीत. दोन जीवांपोटी महिलांना भीती वाटत आहे. लसीकरणाबाबतची भीती महिलांमधील अजून दूर झालेली नाही. खरे पाहिले तर गर्भवतीमातांनी लसीकरण केले, तर काही साइड इफेक्ट होत नाही, असे शासनाने व आरोग्य संस्थेने जाहीर केले आहे. परंतु, दोन जीवांच्या भीतीपोटी महिला लसीकरण करत नाहीत.
तीन लसीकरण केंद्रांवर ‘लोकमत’
शनिवारी शहरातील तीन केंद्रांवर पाहणी केली असता एकही गर्भवती महिला लसीकरणासाठी आलेली दिसून आली नाही. यावेळी कल्याण मंडपम येथे स्त्री ५०, पुरुष ९०, सरजूदेवी स्त्री २० पुरुष ५०, माणिक स्मारक येथे स्त्री ४० तर पुरुष ६० अशांनी लसीकरण करून घेतले. शनिवारी या तिन्ही केंद्रांवर स्त्रिया ११० तर पुरुष १९० जणांनी लसीकरण केले. सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत तरी या केंद्रांवर गर्भवती महिला आलेल्या दिसून आल्या नाहीत. गर्भवती महिलांनी मात्र लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले.
दोन जीवांची भीती...
गर्भवतींनी लसीकरण केले तरी चालेल, असे शासन व आरोग्य विभाग सांगत आहे. परंतु, लेकराला काही होईल म्हणून लसीकरण करायचे धाडस होत नाही, अशी प्रतिक्रिया एका गर्भवती महिलेने दिली. आपल्याला काही झाले तरी चालेल, पण लेकरांना काही होऊ नये, असे तिला वाटते.
कोरोनाच्या भीतीमुळे लसीकरण करावे वाटते. परंतु, पोटातल्या गोळ्याला काही इजा होईल म्हणून लसीकरण करण्याचे टाळत आहे. शासनाने लसीकरणानंतर काही होत नाही, असे सांगितले असले तरी लस घेण्याचे धाडस होत नाही, अशी प्रतिक्रिया गर्भवती महिलेने दिली.
प्रतिक्रिया...
न घाबरता लस घ्या...
गर्भवती महिलेने घाबरण्याचे काहीएक कारण नाही. लसीकरणानंतर बाळाला काहीही इजा होणार नाही, असे आरोग्य संस्थेने सांगितले आहे.
तेव्हा गर्भवती महिलांनी लसीकरण करून घेणे हे त्यांच्या दृष्टीने फायद्याचेच आहे. लसीकरणासाठी दूरच्या केंद्रावर न जाता जवळच्या केंद्रावर लसीकरण करून घ्यावे. लसीकरणाअगोदर फॅमिली डॉक्टरांचा सल्ला मात्र आवश्यक घ्यावा.
-डॉ. सचिन भायेकर, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी