आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : श्रद्धा-आफताब प्रकरणाने संपूर्ण देश सुन्न झालेला असतानाच कळमनुरी तालुक्यातील ग्रामीण भागातही लिव्ह इन रिलेशनशिपमधून धर्मांतर करण्यासाठीचा दबाव टाकल्याची व लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याची तक्रार दाखल झाली. लग्नाचे आमिष दाखवत एका महाविद्यालयीन तरुणीला पळवून नेऊन वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला. तिने लग्नाचा तगादा लावला म्हणून त्याने लिव्ह इन रिलेशनशिपसाठी बाँड बनवला. तरीही तिने लग्नाचा हट्ट धरल्यानंतर मुस्लीम धर्म स्वीकारला तरच तुझ्याशी निकाह करेन, असे सांगत तिच्यावर जबरदस्ती केली. धर्मांतर तिला मान्य नसल्याने अखेर तिने आई-वडिलांचे घर गाठले. वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुद्ध बाळापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला. कळमनुरी तालुक्यातील रेडगाव येथील एक २१ वर्षीय तरुणी कै. शंकरराव सातव कॉलेज, जवळा पांचाळ येथे बीए तृतीय वर्षामध्ये शिक्षण घेत होती. त्यावेळी गावातील साजिद रफिक खान पठाण या तरुणासोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. दरम्यानच्या काळात या मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा विवाह जुळवला होता. पण, प्रेमात आकंठ बुडालेली ती प्रियकर साजीद रफिक खान पठाण याच्यासोबत पळून गेली.८ जुलै २०२२ रोजी ते दोघे जवळा पांचाळ येथून पळून गेले. सुरुवातीला परभणी, औरंगाबाद, फरीदाबाद, दिल्ली असे पळून जाऊन तिथे थांबले. तिथे एक रूम भाड्याने घेऊन राहत होते. तिने लग्नासाठी हट्ट धरला. परंतु त्याने टाळाटाळ केली. वेळोवेळी तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. फरीदाबाद दिल्ली येथे एका वकिलाकडे जाऊन लिव्ह इन रिलेशनशिपचा बाँड तयार केला. त्यावर दोघांनी स्वाक्षऱ्या केल्या. पुन्हा ते परभणी आणि गावाकडे परतले.
‘धर्मांतर केलेस, तरच मी तुझ्याशी निकाह करतो’- तिने लग्नासाठी तगादा लावला असता तू मुस्लिम धर्म स्वीकारलास, धर्मांतर केलेस तरच मी तुझ्याशी निकाह करतो, असे तो म्हणाला. तिला धर्मांतर करणे मान्य नसल्याने ती भावाला बोलून माहेरी निघून गेली आणि पोलिस ठाणे गाठले. - मुलीच्या तक्रारीवरून आरोपी साजिद रफिक खान पठाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे हे करीत आहेत. या प्रकरणातील आरोपीस अटक केली आहे.