लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नाफेडतर्फे शेतीमालाची खरेदी करताना नेहमीच ‘खरेदी कमी अन् गोंधळच जास्त’ झाल्याने वारंवार तिढा निर्माण होत होता. सहकारमंत्र्यांनी आदेश देवूनही केंद्र सुरू झाले नाही. दुसरीकडे मोंढ्यातच दर तीन हजारांपर्यंतही मिळू लागले आहेत.नाफेडने खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून शेतीमालाची खरेदी करणे सुरु केले होते. मात्र केंद्रावर व्यापा-यांचा माल खरेदी होत असल्याच्या आरोपानंतर त्यांच्याकडून खरेदी काढून घेत खरेदीचे आदेश नाफेडने कृउबालाच दिले. सहकारमंत्र्याच्या हस्ते ८ क्विंटल खरेदी केल्यानंतर हा आकडा काही पुढे गेला नाही. सोमवारी खरेदी बंद असल्याची वेगळीच कारणे समोर आली. येथे नाफेडचा ग्रेडरच आला नसल्याने खरेदी बंद झाली होती. वास्तविक पाहता सभापती हरिश्चंद्र शिंदे यांनी जिल्हाउपनिबंधक यांना वारंवार फोन करुनही ग्रेडर न आल्याचे सांगितले. मात्र उशिरापर्यंत ग्रेडर केंद्रावर पोहोचलाच नसल्याने खरेदी थांबली होती. मात्र बाजार समितीत नोंदणी असलेल्या शेतक-यांना २६, २७ नोव्हेंबर रोजी माल खरेदीस आणण्याच्या सूचना दिल्यानंतर त्यांनी आणलेल्या मालाचे अजूनही मोजमाप झालेले नाही. त्यातच आता खरेदी विक्री संघाचे अधिकार काढून कृउबाकडे खरेदीचे आधिकार आल्यानंतर तरी खरेदीला वेग येतो की नाही? असे शेतक-यांतून बोलले जात आहे.सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिलेल्या सूचनांचे कितपत पालन होते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सर्व प्रकारामध्ये शेतक-यांची मुक्कामापासून सुटका काही होत नसल्याचे चित्र आहे. येथे रात्री-अपरात्री मालाची चोरी होत असल्याच्या तक्रारीही शेतक-यांतून होत आहेत.
शेतीमाल खरेदीचा गुंता कायमच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:05 AM