लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : स्वतंत्र, समता व बंधुत्व ही तीन मूल्ये म्हणजेच मानवी हक्काचा गाभा असल्याचे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मानवी हक्क दिनानिमित्त कार्यक्रमात मिनियार बोलत होते. यावेळी उगमचे जयाजी पाईकराव, अॅड. के.जी. अरगडे, निवासी उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, सहाय्यक संचालिका रेणुका तमल्लवार, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, नायब तहसीलदार र. वै. मिटकरी आदी उपस्थित होते.यावेळी मिनियार म्हणाले की, समाजातील अंधश्रध्देतून मुक्ततेसाठी समाजातील विविध रुढी-परंपरा, चालीरीती, दूर होणे गरजेचे असून सद्यस्थितीत घटनेतील विविध कलमांचा अभ्यास करुन मानवी हक्काची जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. जयाजी पाईकराव म्हणाले की मानवी अधिकाराचे उल्लंघन न होऊ देणे हे जागतिक मानवी हक्क दिनाचे मुख्य उद्दिष्ट होय. तर अॅड. अरगडे म्हणाले की, मानवी हक्क हा विषय फार विशाल असून मानवी हक्काची व्याख्या पाहता ती व्यक्तींच्या जीवनातील स्वातंत्र, समता व प्रतिष्ठा जपणे म्हणजेच मानवाचे हक्क होत असे त्यांनी सांगितले. ना. तहसीलदार मिटकरी यांनी मानवी हक्क दिनाचा मुख्य हेतू, या वर्षीचे घोषवाक्य ‘भेदभावाचे उच्चाटन म्हणजे मानवी हक्काचे रक्षण’ याची सविस्तर माहिती दिली.
मानवी हक्क दिनानिमित्त कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 12:45 AM