लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हिंगोली येथे सार्वजनिक शिवजयंती महोत्सव साजरा केला जाणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव जिल्हाभरात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त हिंगोलीत सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने मोटारसायकल रॅलीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सायंकाळी ६ ते ७ या वेळेत दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. महोत्सवात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन सार्वजनिक शिवजयंती महोत्सवाच्या वतीने करण्यात आले आहे.शिवजयंती महोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नियोजन समितीच्या वतीने सूचना करण्यात आल्या असून महोत्सवात व रॅलीत सर्वच सामाजिक संघटना, पक्ष, विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक सहभागी होणार आहेत. सर्व कार्यक्रमात अठरापगड जातीतील व सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, छत्रपती शिवराय पूर्णाकृती पुतळा समिती हिंगोलीच्या वतीने करण्यात आले आहे. शिवजन्म महोत्सव आगळा-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी समितीच्या वतीने परिश्रम घेतले जात आहेत.शिवजयंती महोत्सवानिमित्त सकाळी ९.३० वाजता पाळणा व शिवपूजनाने प्रारंभ होणार आहे. सकाळी १० ते १२ या वेळेत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन, सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत पुतळा परिसरात रक्तदान शिबीर, दुपारी १२.३० ते सायंकाळी ४ या वेळेत रथ, घोडे, लेझीम पथक, महिलांची कलशयात्रा, महिलांची लाठी-काठी, ढोल-ताशा पथक व विविध देखाव्यासह भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी २ ते ३ यावेळेत रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून सायंकाळी ४ ते ६ यावेळेत मुख्य कार्यक्रम घेण्यात येणार आहे. सायंकाळी ६ ते ७ यावेळेत आतषबाजी व दीपोत्सव व रात्री ७ ते ९ या वेळेत शिवपोवाडे व शिवगीतांच्या बहारदार कार्यक्रमाने सांगता होईल.
शिवजन्मोत्सवानिमित्त जिल्हाभरात कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 12:58 AM