वसमत (जि. हिंगोली) : वसमत नगरपालिकेत वडिलोपार्जित मालमत्ता बनावट कागदपत्रे तयार करून व बनावट नोंद करून परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांसह तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा केला आहे. या प्रकाराने वसमत न. प. वर्तुळात खळबळ उडाली आहे.
वसमत येथील अमजद बेग रहमत बेग यांचे काजीपुरा भागातील घर क्रमांक २४४ नवीन घर नंबर ३४८ हे बनावट दस्तावेज तयार करून बनावट नोंदी करून तिसऱ्याच्या नावे झाल्याचा प्रकार घडला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी पाठपुरावा केला असता त्याला उडवाउडवीची उत्तरे देऊन मालमत्तेपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. वरिष्ठांपर्यंत तक्रारी केल्या मात्र कुणीही दाद देत नव्हते. तब्बल वीस वर्षांपूर्वी हा प्रकार घडला होता. मात्र, मूळ मालकास २०१५ मध्ये फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तेव्हापासून त्यांनी पाठपुरावा सुरू केला. मात्र, कोणीही दाद देत नव्हते. माहिती अधिकारांतर्गत माहिती मिळत नव्हती. अपील केल्यानंतर व खंडपीठात माहिती अधिकाराखाली धाव घेतल्यानंतर माहिती अधिकार खंडपीठाने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना २०१८ मध्ये दिले होते. मात्र, त्या आदेशाचीही अवहेलना करण्यात आली.
फिर्यादीने पुन्हा खंडपीठाकडे धाव घेतली. त्यानंतर खंडपीठाने पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. अखेर याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी अमजद बेग यांच्या तक्रारीवरून वसमत शहर पोलीस ठाण्यात फारुख बेग रुस्तुम बेग, महारुफ बेग फारुख बेग (दोघे राहणार खाजीपुरा वसमत) व तत्कालीन मुख्याधिकारी श्रीनिवास कोतवाल यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. आता यात आणखी कोणी आरोपी आहेत का ? याचा शोध घेण्याची जबाबदारी वसमत पोलिसांवर आली आहे. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे, पो.उपनि. बरगे करत आहेत.