हिंगोली : जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागामार्फत निविदा न काढताच कामे पूर्ण झाल्याच्या प्रकरणात चौकशी करून दोषींवर कारवाईचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आल्याची माहिती स्वच्छता व जलव्यवस्थापन समितीत देण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष गणाजी बेले होते. तर उपाध्यक्ष मनीष आखरे, सभापती रुपाली पाटील गोरेगावकर, बाजीराव जुंबडे, भैय्या देशमुख, राठोड आदींची उपस्थिती होती. यावेळी निविदा न काढताच झालेल्या कामांवर चर्चा झाली. यात दोषींवर काय कारवाई केली? त्याची विचारणा आखरे यांनी केली. त्यात कार्यकारी अभियंता वाघमारे यांनी प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केल्याची माहिती दिली. तर ही दोन कामे रद्द असून आणखी चार कामे शेतकऱ्यांची संमती न घेताच होत असल्याने रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
५० ते ५०० लोकसंख्या असलेल्या व व उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणाऱ्या वस्त्यांमध्ये स्व.मीनाताई ठाकरे योजनेत पाणीपुरवठ्याची उपाययोजना करण्याचा ठराव घेण्यात आला. अशा गावांचा सर्व्हे करून तेथे झिंक टाकी उभारण्यात येणार आहे.
सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आराखड्यात निवडलेल्या ७० गावांसाठी २.६३ कोटी मंजूर झाले आहेत. मात्र या गावांत कामे करण्यासाठी २० टक्के निधी ग्रा.पं.च्या वित्त आयोगातून खर्च करावा लागणार आहे. आधीच ग्रा.पं.ला यात अपुरा निधी मिळतो. त्यामुळे स्थानिक सुविधांवर खर्च करण्यास निधीच राहणार नसल्याने ही कामे मग्रारोहयोतून करून २० टक्क्यांची पूर्तता करण्याचा ठरावही घेण्यात आला.