सेनगाव (हिंगोली ) : ई-नाम पध्दतीनेच शेतमाल खरेदी करावा अशा बंधनकारक सुचना जिल्हा उपनिबंधकानी दिल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येत या विरोधात मोंढा बंद केला.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज आडत व्यापारी व प्रशासनात ई-नाम योजनेच्या निमित्ताने वादाचा भडका उडाला. केंद्र शासनाने ई -नाम योजनेत समाविष्ट झालेल्या सर्व बाजार समितामध्ये ई -टेंडर पध्दतीने शेतमाल खरेदी करावे असे सक्त निर्देश दिले आहेत. याच्या अंमलबजावणीसाठी आज जिल्हा उपनिबंधक मैत्रेवार, सहाय्यक निबंधक जाधव यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत ई -टेंडर पद्धतीने सर्व शेतमाल खरेदी करावा अशा बंधनकारक सुचना दिल्या. याला बैठकीतच व्यापाऱ्यांनी तिव्र विरोध केला. ई -नाम योजने अंतर्गत बाजारसमितीमध्ये ई-टेंडर पद्धतीने हळदीची खरेदी केली जात असल्याने आवक घटली असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे व्यापारी विरुद्ध प्रशासन हा वाद निर्माण झाला. या वादातून व्यापाऱ्यांनी मोंढा बेमुदत बंद चा निर्णय घेतला.
दुपारनंतर सुरु झाला मोंढा
दुपारी तीन सुमारास या संबंधी तोडगा काढण्यासाठी बाजार समिती प्रशासक योगेश आरसुड,सचिव दत्तात्रय वाघ,शिवसेना उपजिल्हा संदेश देशमुख, नगरसेवक उमेश देशमुख, भुसार असोसिएशन चे अध्यक्ष बालमुकंद जेथलिया आदी सह व्यापारी, शेतकऱ्यांचा उपस्थितीत बैठक झाली. यात केवळ हळद ई-टेंडर पद्धतीने खरेदी करण्यास व्यापारी तयार झाले. त्या नंतर मोंढा पून्हा पूर्वरत सुर झाला. आज आठवडी बाजार असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेतमाल विक्रीसाठी आणला होता. पंरतु दुपार पर्यंत मोंढा बंद असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय झाली.