हिंगोली : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी 11 वाजता धरणे आंदोलनास प्रारंभ झाला. यासोबतच जवळाबाजार येथे सुरु असलेल्या चक्काजाम आंदोलनात तीन बसेसवर दगडफेक करण्यात आली.
जिल्ह्यात विविध ठिकाणी मराठा समाजातर्फे आंदोलन सुरू आहेत. आज शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय समोर मराठा समाजाच्या धरणे आंदोलनाला सुरुवात झाली. यात जिल्ह्यातील विविध भागातून आलेले शेकडो कार्यकर्ते धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत. या ठिकाणी मान्यवरांची भाषणे होत असून त्यात सरकारवरील टीकेचा सूर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय नोकरीमध्ये आरक्षण देण्याचे विधानसभेत आश्वासन दिले. मात्र हे आश्वासन पोकळ आहे असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला
तीन बसेसवर दगडफेक दरम्यान, जवळाबाजार येथे सुरु असलेल्या चक्काजाम आंदोलनाला हिंसक वळण लागले. यात तीन बसेसवर दगडफेक करण्यात आली. दगडफेकीमुळे बसचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे या भागात काही काळ तणाव होता.
औंढा नागनाथ : तालुक्यातील येहलेगाव सोळणके येथे शुक्रवारी रात्री 10 वा सुमारास जमावाने हिंगोली आगाराची हिंगोली परभणी जाणारी बस वर दगडफेक केली यात सुदैवाने एकही प्रवाशी जखमी झाला नाही या बाबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे