हिंगोली : सुशिक्षित बेरोजगार कृती समिती हिंगोलीच्या वतीने आक्रोश मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. तर कंत्राटी भरतीचा जीआरही जिल्हा कचेरीसमोर जाळून त्याचा निषेध नोंदविण्यात आला.
राज्य सरकारने हजारो पदांसाठी कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याचा जीआर काढला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात भरतीमध्ये सामाजिक आरक्षण ठेवले नाही, ही कृतीच मुळात असंवैधानिक असल्याचा आरोप केला. यात एससी, एसटी, ओबीसी व्हीजेएनटी, एसबीसी, अपंग, महिला, आरक्षण नाकारले आहे का ? प्रश्न उपस्थित होत आहे.
अ ब क आणी ड संवर्गातील या जागा असून इतक्या मोठ्या प्रमाणात केवळ कंत्राटी पद भरती होणार असेल तर यामागे गौडबंगाल असल्याचा आरोपही केला. संविधान कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली मोर्चा काढून सुशिक्षित बेरोजगार कृती समीतेचे पदाधिकारी किरण घोंगडे, मुनिर पठाण, अॅड. प्रशांत बोडखे, कुमार कुर्तडीकर, बंडू नरवाडे, तारा खंदारे, राहुल बहात्तरे, गजानन कावरखे, सुशील कसबे, संदीप भुक्तर, नितिन गव्हाणे, अमजद शेख, नामदेव पतंगे, नंदकिशोर दिंडे ,अश्विनी बगाटे, वैशाली खिलारे, वैष्णवी मस्के, दिव्या बगाटे , संतोष सावंत, यश कोकरे, विक्की जगताप आदींच्या उपस्थितीत जीआरची होळी केली.
शुल्क कमी करावेकुठल्याही भरती प्रक्रियेत परीक्षेची फिस हजार ते बाराशे रुपये ठेवली जात आहे. ती शासनाने कमी करावी आणि नोकऱ्यांचा खाजगीकरणाचा जीआर रद्द करावा अन्यथा आणखी उग्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.