हिंगोली : मणिपूरमध्ये आदिवासी महिलांची नग्न धिंड काढणाऱ्यांवर कारवाई करून या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी आदिवासी युवक कल्याण संघाच्यावतीने राष्ट्रपतींकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले की, ईशान्य भारतातील बहुतांश राज्ये ही आदिवासीबहुल आहेत. जे लोक आपली सांस्कृतिक ओळख कायम ठेवून आपल्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेत असतात. त्यांच्यावर सातत्याने अत्याचार केला जात आहे. त्यांच्यावरच नव्हे, तर आज धर्मांध राज्यकर्त्यांच्या काळात संपूर्ण आदिवासी समाज भयभीत झाला आहे. गैरआदिवासींना आदिवासीच्या यादीत टाकण्याचे आश्वासन देत मतदानासाठी असा अट्टाहास केला जात आहे. याच कारणातून मैती व कुकी नाका यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. अनेकांचा बळी गेला. महिलांवर अत्याचार होत आहेत. आदिवासींच्या या वेदना केंद्र सरकारला दिसत नाहीत, ही शोकांतिका आहे. मणिपूर सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली.
या धरणे आंदोलनात माजी आ.संतोष टारफे, माजी जि.प.अध्यक्ष गणाजी बेले, डॉ.सतीश पाचपुते, नंदू तोष्णीवाल यांच्यासह आदिवासी समाजातील बहुतांश नेतेमंडळी उपस्थित होती.