कुरुंदा : उसाचे थकलेले बिल, वाहतूक तोड दिली जात नसल्याने १३ मे रोजी येथील टोकाई कारखान्याच्या साइटवर आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी ‘जनआक्रोश’ बैठक घेण्यात आली. या बैठकीस शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींचीही उपस्थिती होती.
टोकाई सहकारी साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचे उसाचे बिल थकल्याने कारखान्यावर कार्यवाहीचा आदेश निघाला होता. कारखान्याने शेतकऱ्यांची बिले देण्यासाठी हात वर केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बिलाचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्यासाठी जनआक्रोश बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, सुभाष वानखेडे, शिवाजी माने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विनायक भिसे, बाळासाहेब मगर, गोपू पाटील, रावसाहेब आडकीने, गोरख पाटील, प्रल्हाद राखोडे, धोंडीराम पार्डीकर, चंद्रकांत दळवी यांच्यासह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. बैठकीदरम्यान सहकारमंत्र्याशी संवाद साधण्यात आला असता बुधवारी बैठक बोलावून तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर वसमत येथे तहसील प्रशासनाला निवेदन देण्यात आले.