हिंगोली : इंधन, गॅस दरवाढीनंतर आता भाजीपाला आणि डाळींच्या किमतीही वाढल्या आहेत. घाऊक बाजारात दर काही प्रमाणात स्थिर असले तरी महागाईसाठी इंधन दरवाढ व आवक कमी असल्याचे कारण पुढे केले जात आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे.
मागील काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. इंधन दरवाढीने वाहतुकीचा खर्च वाढत आहे. त्यामुळे भाजीपाला व डाळीच्या किमती वाढत असल्याचे सांगितले जात आहे. त्यात कोरोनामुळे दुकाने उघडी ठेवण्यास पुन्हा निर्बंध आहेत. याचाही फटका दरवाढीला बसत आहे. हिंगोली येथील भाजी मंडईमध्ये गुरुवारी भाज्याची आवक बऱ्यापैकी असली तरी भाज्याचे दर प्रति किलो २० रुपयांपासून ते ८० रुपयांपर्यंत होते. आलू, कांदे वगळता इतर भाजीपाला प्रतिकिलो ३० रुपयांच्या पुढेच होता. हीच स्थिती डाळीच्या बाबतीतही होती. आगामी सण, उत्सव लक्षात घेता डाळीच्या किमतीतही १० ते २० रुपयांची दरवाढ गुरुवारी आढळून आली. इंधनाचे वाढते दर आणि कोरोनाच्या अनुषंगाने घातलेल्या निर्बंधांचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या दरावर होताना दिसत आहे.
म्हणून भाजीपाला कडाडला...
कोरोनामुळे शेतकऱ्यांकडील भाजीपाला बाजारपेठेत येणे कमी झाला आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर वधारले आहेत. किमान एखादा महिना तरी दर असेच राहण्याची शक्यता असल्याचे समगा येथील भाजीपाला विक्रेते मारोती पातळे यांनी सांगितले.
म्हणून डाळ महागली...
आगामी सण, उत्सव लक्षात घेता डाळींना मागणी वाढली आहे. मात्र, इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला आहे. तूर डाळ वगळता स्थानिक बाजारपेठेत इतर डाळी आयात कराव्या लागतात. त्यामुळेच डाळीचे दरही किंचित वाढले आहेत. सध्या तूर डाळ, ११०, मूग, उडीद ९० ते १०० तर मसूर डाळ ८० रुपये प्रमाणे विक्री होत असल्याचे विक्रेते शेख गौस यांनी सांगितले.
गॅस सिलिंडर, खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे किचनमधील बजेट कोलमडले आहे. त्यात डाळी व भाजीपाल्याचे दरही वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांनी कसे जगायचे?
- सविता बांगर, वंजारवाडा, हिंगोली
कोरोनामुळे अगोदरच जगणे मुश्कील झाले आहे. त्यात गॅस, खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीची भर पडली आहे. आता भाजीपाला व डाळीचे दर वाढल्याने मोठी काटकसर करावी लागत आहे.
-पुष्पा जायभाये, आखाडा बाळापूर
डाळीचे दर (प्रति किलो)
तूर - १०५ ते १२०
मूग - ८५ ते ११०
उडीद - ९०ते ११०
मसूर - ७२ ते ८०
भाजीपाल्याचे दर (प्रति किलो)
वांगे - ८०
मिरची - ६०
भेंडी - ३०
चवळी - ४०
आलू - २०
टोमॅटो - ४०
आद्रक - ४०
दोडके - ४०
सर्वसामान्यांचे हाल